नवी दिल्ली । भारतीय संघ लवकरच दक्षिण आफ्रिकेच्या दौर्यावर जाणार आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत असा मैदानात सामना रंगण्यापूर्वीच शाब्दिकयुद्ध सुरू झाले आहे. प्रत्येकजण आपला विजय होणार असल्याचा दावा करत आहे. दोन्ही संघ आपली बाजू मजबूत असल्याचे म्हणत आहेत. मात्र, असे असले तरी येत्या काळात कोण जिंकणार आणि कोण हरणार हे स्पष्ट होणार आहे.
श्रीलंके विरुद्धची एकदिवसीय क्रिकेट आणि टी 20 क्रिकेट मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ याने विराट कोहली आणि भारतीय संघाला आव्हान दिले आहे. ग्रीम स्मिथ म्हणाला की, भारतीय संघासाठी खरे आव्हान दक्षिण आफ्रिकेत आहे. भारतीय संघ ज्यावेळी घरातून बाहेर पडेल आणि परदेशात खेळण्यास येईल त्यावेळी त्यांची खरी परीक्षा असणार आहे. आमच्या गोलंदाजांना आपले कौशल्य आणि कामगिरी दाखवण्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे, असेही स्मिथने म्हटले आहे.