दक्षिण आशिया उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0

श्रीहरिकोट्टा : भारतीय अंतराळ संस्था (इस्रो)ने श्रीहरिकोट्टा येथून शुक्रवारी दक्षिण आशिया उपग्रहाचे (जीसॅट-9) यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहामुळे दक्षिण आशियातील पाकिस्तान वगळता इतर देशांना मदत होणार आहे. या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोच्या ऐतिहासिक कामगिरीत भर पडली आहे. ‘जीसॅट-9’ च्या निर्मितीसाठी 235 कोटींचा खर्च आला आहे. ‘जीसॅट-9’ मुळे दक्षिण आशियातील देशांमधील दूरसंचारसाठी मदत होणार आहे. भारताच्या शेजारील देशांना कोणताच खर्च उचलावा लागणार नाही. त्यामुळे या देशांना भारताकडून ही भेट असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

उंदरांना लागली दारूची चटक
पाटणा : बिहारमधील दारूबंदीचा कोणावर काय परिणाम झाला ही बाब वेगळी; पण या राज्यातील उंदीर दारूच्या अधीन झाले आहेत! हे वाचल्यावर कदाचित आश्चर्य वाटेल; पण या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. फक्त एवढेच की, उंदीर खरोखरच दारू पिऊ लागले आहेत की पोलिसांनीच त्यांची निष्क्रियता उंदरांवर ढकलली आहे, याची चौकशी होत आहे. पाटण्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक मनू महाराज यांनी आयोजित केलेल्या गुन्हेविषयक बैठकीत हा विषय एकदम चर्चेला आला. उंदरांना दारूची चटक लागल्याची तक्रार एका ठाणे अंमलदाराने केल्यावर सगळ्यांना धक्काच बसला. पोलिसांच्या मालखान्यात (जप्त केलेल्या वस्तू ठेवण्याची जागा) ठेवलेल्या दारूच्या बाटल्या उंदीर खाली पाडून फोडतात आणि त्यातील दारू पितात, असा या ठाणे अंमलदाराचा दावा आहे. जप्त करून मालखान्यात ठेवलेल्या दारूच्या बाटल्यांची संख्या कमी होत असल्याचे आढळल्यावर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

जीएसटीमुळे अर्थव्यवस्था सुधारणार
नवी दिल्ली : येत्या जुलै महिन्यापासून लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे (जीएसटी) भारतीय अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होईल. आगामी आर्थिक वर्षात याचे परिणाम पाहायला मिळतील, असा विश्वास केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. आशियाई विकास बँकेच्या 50व्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर दास यांनी जपानमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी दास यांनी गेल्या दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत 2018-19 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 8 टक्के इतका राहील, असा अंदाज व्यक्त केला. सध्या केंद्र सरकार अनेक आर्थिक सुधारणा राबवण्याच्यादृष्टीने काम करत आहे. याशिवाय, निश्चलनीकरणाच्या निर्णयामुळे कराचा पाया विस्तारेल. तसेच समांतर अर्थव्यवस्थेला आळा बसेल, असे मत दास यांनी मांडले.