दक्ष, मानस, श्रुती, वेदला विजेतेपद

0

पुणे । पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) आयोजित अरुण वाकणकर मेमोरियल एटीएफ आशिया 14 वषार्ंखालील टेनिस स्पर्धेत दुहेरीत मुलींच्या गटात श्रुती अहलावत व वेद प्रापुर्णा यांनी, तर मुलांच्या गटात दक्ष अगरवाल व मानस धामणे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
म्हाळुंगे बालेवाडी येथील एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत मुलांच्या गटात दक्ष अगरवाल याने मानस धामनेच्या साथीत शिवम कदम व नितीस नल्लूस्वामी यांचा 7-5,5-7,10-6, असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. हा सामना 2तास 20मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सामन्याच्या सुरुवातीला 2-0अशा फरकाने पिछाडीवर असताना दक्ष अगरवाल व मानस धामने यांनी आक्रमक खेळ करत आठव्या, दहाव्या गेममध्ये शिवम कदम व नितीस नल्लूस्वामी यांची सर्व्हिस भेदली व हा सेट 7-5असा जिंकून आघाडी घेतली.

दुसर्‍या सेटमध्ये शिवम कदम व नितीस नल्लूस्वामी यांनी वरचढ खेळ करत सहाव्या, आठव्या गेममध्ये दक्ष अगरवाल व मानस धामने यांची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5असा जिंकून बरोबरी साधली. सुपरटायब्रेकमध्ये दक्ष अगरवाल व मानस धामने यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत हा सेट 10-6, अशा फरकाने जिंकून विजेतेपदावर नाव कोरले.

स्पर्धेतील इतर निकाल
दुहेरी गट- अंतिम फेरी-मुले
दक्ष अगरवाल(भारत)(3),मानस धामने(भारत) वि.वि.शिवम कदम(भारत)(1),नितीस नल्लूस्वामी(भारत)7-5,5-7,10-6
मुली -श्रुती अहलावत (भारत)(2), वेदा प्रापुर्णा(भारत) वि.वि.हेतवी चौधरी (भारत)(1),परी सिंग (भारत)6-2,4-6,10-7.

एकेरीच्या अंतिम लढती आज रंगणार
मुलींच्या गटात अंतिम फेरीच्या लढतीत श्रुती अहलावत व वेदा प्रापुर्णा यांनी हेतवी चौधरी व परी सिंग या जोडीचा 6-2,4-6,10-7असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. स्पर्धेच्या एकेरी गटाचे सामने आज, 9 जून रोजी सकाळी 10 वाजता होणार असून मुलांच्या गटातील अंतिम सामना दक्ष गरवाल व मानस धामणे यांच्यात, तर मुलींच्या गटांतील श्रुती अहलावत व वेदा प्रापुर्णा यांच्यात होणार आहे.