दगडफेकीसाठी चिथावणी देणारे 300 व्हॉटसअ‍ॅप ग्रुप

0

श्रीनगर : काश्मिरमध्ये भारतीय सुरक्षा दलांवर होत असलेल्या दगडफेकीचे नियोजन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी एका पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार दगडफेकीसाठी तब्बल 300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून काश्मिरमधील तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी काश्मिरमध्ये पोट निवडणूक घेण्यात आली. यावेळी सुरक्षा दलावर स्थानिकांनी दगडफेक केली. तसेच जवानांना लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर काश्मिर खोर्‍यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली; आणि त्याच बरोबर दगडफेकीत कमालीची घट झाली. अधिकार्‍याच्या माहितीनुसार इंटरनेट बंदी नंतर विद्वेष आणि अस्थिरता पसरवणारे 90 टक्क्यांहून अधिक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बंद झाले आहेत.

एका ग्रुपमध्ये 250 जण
300 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये प्रत्येकी 250 सदस्य होते. या ग्रुपमधून दगडफेकीचे ठिकाण ठरवले जात असे आणि त्या ठिकाणी काही वेळातच प्रक्षोभक जमाव जमा केला जात असे. या जमलेल्या जमावाला फुटीरतावाद्यांकडून सुरक्षा दलांविरोधात भडकावून त्यांना दगडफेक करण्यास प्रवृत्त केले जात होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून असे व्हॉटसअ‍ॅप ग्रुप शोधून त्याच्या अ‍ॅडमिनना पोलिस ठाण्यात बोलावून समज देण्यात आली आहे. त्यानंतर गेल्या तीन आठवड्यात 250 पेक्षा जास्त व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काश्मीर खोर्‍यातील इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे दगडफेकीच्या घटना कमी झाल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले होते. इंटरनेटशिवाय इतका मोठा जमाव गोळा करणे जवळपास अशक्य आहे. अनेकवेळा तर लष्करी कारवाईच्या ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावरील तरूणही दगडफेकीत सामील झाल्याचे निदर्शनास आले आहे. नुकत्याच झालेल्या बडगाम जिल्ह्यातील घटनेच्यानिमित्ताने याचा प्रत्यय आला. 28 मार्चला येथील दुरबुग गावाच्या परिसरात मोठ्याप्रमाणावर दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन आंदोलकांचा मृत्यूही झाला होता. मात्र, काल याठिकाणी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतरही परिस्थिती वेगळी होती. यावेळी इंटरनेट सेवा बंद ठेवल्यामुळे दगडफेक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.