दगडाने ठेचून कैद्याचा खून

0

येरवडा (पुणे) : येरवडा मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसर्‍या कैद्याच्या डोक्यात दगड घालून आणि नंतर ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक व गंभीर प्रकार घडला. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कैदी स्वयंपाक घरात काम करत होते. त्यांच्यामध्ये काही क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली. यावेळी एका कैद्याने दुसर्‍याचे लक्ष नसताना पाठीमागून दगडाने हल्ला करुन त्याची हत्या केली. आरोपीचे नाव दिनशे दबडे (वय 35) असे असून, तो हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. तर सुखदेव मेघराज महापुरे (वय 43) असे हत्या करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात त्याला साडेतीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या सात महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आरोपी व हत्या करण्यात आलेला कैदी दोघेही एकाच बराकीमध्ये राहत होते.

खाली पडल्यानंतर दगडाने ठेचले
येरवडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी येरवडा कारागृहात कातिल सिद्दीक याचा मोहोळ टोळीतील गुन्हेगारांनी खून केला होता. आजच्या खूनच्या प्रकारामुळे पुन्हा कारागृहातील कैदी आणि प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत कैद्यांना बाहेर सोडले जाते. त्या दरम्यान, सकाळी 11 वाजेच्या सुमारास या दोन कैद्यांमध्ये वाद झाला होता. दबडे याने या वादाचा वचपा काढण्यासाठी महापुरे या कैद्याच्या डोक्यात पाठीमागून येऊन दगड घातला. घाव वर्मी लागल्याने तो खाली कोसळला त्यावेळी दगडाने अक्षरशः ठेचून त्याची हत्या करण्यात आली. ठार करण्यात आलेला कैदी हा मूळचा अहमदनगरचा आहे. मुंबईतील भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये हत्याप्रकरण ताजे असतानाच, ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. पुढील तपास पोलिस करत आहेत. या निमित्ताने कारागृहातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.