‘दगडूशेठ’साठी ब्रह्मणस्पती मंदिराचा देखावा

0

पुणे । श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गाणपत्य शैलीचे आगळेवेगळे मंदिर साकारण्यात येणार आहे. यंदा 40 किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण दागिनेही चढवले जाणार आहेत. शुक्रवारी (दि.25) सकाळी 10 वा. प.पू. पीरयोगी श्री गणेशनाथ महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तब्बल 1 लाख 25 हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

यावेळी हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, डॉ. बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8 वाजता फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यंदाच्या ब्रह्मणस्पती मंदिराचा आकार 111 बाय 90 फूट असून 90 फूट उंची आहे. याशिवाय गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल 36 फुटी नयनरम्य गाभारा हे वैशिष्टय असणार आहे. डेक्कन कॉलेजचे डॉ.श्रीकांत प्रधान आणि गाणपत्य प.पू.स्वानंद पुंड महाराज यांनी मुद्गल पुराणातून याविषयी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे. तब्बल 1 लाख 25 हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. तसेच अत्याधुनिक लाईटस विद्युतरोषणाईकरीता लावण्यात आले आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

पांढर्‍या खड्यांच्या कोंदणातील हार
यंदा 40 किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण दागिने चढवले जाणार आहेत. साडेनऊ किलोचा रत्नजडित मुकुट, सातशे ग्रॅम वजनाचा शुंडहार, सूर्याचा किरणांचा आभास निर्माण करणारे दोन किलो सोन्याचे कान, आणि तब्बल 4 हजार सुवर्ण टिकल्यांचा अडीच किलोचा अंगरखा, कपड्यावर खडेकाम असलेलं साडे तीन किलोचं उपरणं, साडेसहा किलोचं सोवळं त्याला पांढर्‍या खड्यांचे कोंदण असलेला 1 किलोचा हार असे दागिने साकारले आहेत. कपडयावर प्रथमच अशा प्रकारचे काम करण्यात आले आहे. याकरीता पु.ना.गाडगीळ अँड सन्सचे महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक येथील निष्णात 40 कारागिर गेल्या 5 महिन्यांपासून कार्यरत आहेत. बाप्पासाठी साकारलेले सुमारे 40 किलोचे सुवर्णालंकार घडविण्याकरीता सुमारे 1.25 कोटी रुपये मजुरीचा खर्च आला आहे.

50 कोटींचा विमा
अशोक गोडसे म्हणाले, पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड यांसह कॅम्प हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे. यामध्ये दहशतवादी हल्ला वा दुर्घटना झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत.