डॉ. धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना
खा. शिरोळे यांच्या हस्ते होणार विद्युतरोषणाईचे उद्घाटन
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 126 व्या वर्षानिमित्त तामिळनाडू तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी मोरगाव येथील महान गाणपत्य श्री गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ. धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7 वाजता खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुनिल रासने, डॉ. बाळासाहेब परांजपे, महेश सुर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने उपस्थित होते.
दिव्यांनी उजळून निघणार मंदिर
13 सप्टेंबरला प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.30 वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात येणारी ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. लाखो मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
14 सप्टेंबर रोजी पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 25 हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी फिनोलेक्स ग्रुपचे प्रकाश छाब्रिया, रितू छाब्रिया, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री 10 ते 2 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. याशिवाय सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, मंत्रजागर, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम उत्सवात होणार आहेत. अनंत चतुर्दशीला दिनांक 23 सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक विश्वविनायक रथातून निघणार आहे.
गणेशभक्तांसाठी 50 कोटींचा विमा
गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यू झाल्यास प्रति व्यक्तीला 5 लाख, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास 2 लाख आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला 50 हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. 12 ते 24 सप्टेंबरपर्यंत ही विम्याची सुविधा असणार आहे. याशिवाय गणपतीच्या कायमस्वरुपी उभारलेल्या मंदिरात येणा-या भाविकांचा 5 कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तब्बल 150 कॅमेर्यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची 150 पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.