पुणे : पहाटे स्वराभिषेक, सकाळी गणेशयाग, गणेश जागर, सायंकाळी मिरवणूक आणि दुपारी 12च्या सुमारास पाळणा गाऊन सुमारे 150 सुहासिनींच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात गणेशजन्म सोहळा उत्साहात पार पडला. फुलांची आरास व विद्युतरोषणाईने मंदिराला सजविण्यात आले होते. गणपती बाप्पाला 751 किलोचा सुक्या माव्याचा मोदक अर्पण करण्यात आला होता.
दुपारी 12च्या सुमारास 15 सुवासिनींच्या हस्ते गणेशजन्म सोहळा मंदिर परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी स्वाती पंडीत, शारदा गोडसे, संगीता रासणे, ज्योती सूर्यवंशी, मृणालिनी रासणे, मालणताई चव्हाण व अन्य सुहासिनी उपस्थित होत्या. पहाटे 4 ते 6 यावेळेत गायिका मधुरा दातार यांच्याकडून श्रीचरणी स्वराभिषेक अर्पण करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता श्रींची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये फुलांनी सजविलेला आकर्षक रथ, प्रसिद्ध बँड यांचा सहभाग असल्याची माहिती अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.
सूर्यवंशी म्हणाले, यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्ण युग तरुण मंडळाच्यावतीने नगरप्रदक्षिणा, अभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर कार्यक्रम झाले. सुंठवड्याचा प्रसाद वाटण्यात आला. ट्रस्टच्या मोरया प्रतिष्ठानकडून मुळशी तालुक्यातील उरवडे गावातील स्व.बाबुराव रायरीकर विद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले.