एस.टी.च्या चाकातून उडाला दगड ; परसाडे गावातील घटना
यावल- तालुक्यातील परसाडे येथे रस्त्यावरून जात असताना एस.टी.च्या चाकातून उडालेल्या दगडाने एका 14 वर्षीय बालकाच्या डोळ्याला जबर दुखापत झाली. ही घटना 11 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. महेंद्र राजू कोळी (रा.आंदलवाडी, ता.रावेर) असे जखमी बालकाचे नाव आहे. हा बालक परसाडे येथे आपल्या मावशीच्या घरी आला असताना ही दुर्दैवी घटना घडली. यावल ते वड्री या रस्त्याचे सध्या काम सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी व खडी टाकण्यात आली आहे. 11 एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता यावल आगाराची बस वड्री गावाहून यावलकडे परत येत होती. दरम्यान, परसाडे गावाजवळून एस.टी.बस मार्गस्थ होत असताना महेंद्र राजू कोळी (14) हा रस्त्यावरून जात होता. तेव्हा अचानक एस.टी.चाकातून पिस्तूलच्या गोळीसारखा एक दगड उडाला व महेंद्र याच्या डाव्या डोळ्याला लागला त्यात त्यास जबर दुखापत झाली. सुरुवातीला प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याची जखम सुधारत नसल्याने त्याला आता जालना येथील तज्ज्ञ नेत्रचिकित्सालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.