नवी दिल्ली । 2017 सालात घरच्या मैदानावर खेळणार्या टीम इंडियाने आपलं वर्चस्व कायम राखलं. कसोटी, वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत भारताने सरत्या वर्षाचा शेवटही गोड केला. मात्र 2018 सालात भारतासमोर खडतरं आव्हान असणार आहेत. आगामी वर्षात भारताला बहुतांश सामने हे परदेशात खेळायचे आहेत. यापैकी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्याला 5 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या दौर्यात भारतीय फलंदाजांची खरी अग्नीपरीक्षा असणार आहे, मात्र यासाठी आपण तयार असून दडपणाखाली माझा खेळ बहरतो असं म्हणत भारताचा सलामीवीर मुरली विजयने आपण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज तयार असल्याचं म्हणलंय.
दौरा महत्त्वाचा ठरला होता
2013 सालचा दक्षिण आफ्रिका दौरा मुरली विजयाच्या कारकिर्दीतला महत्वाचा टप्पा ठरला. आपल्या फलंदाजीची छाप पाडत मुरली विजयने कसोटी संघात सलामीवीर म्हणून आपलं स्थान बळकट केलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुरली विजयने आगामी दक्षिण आफ्रिका दौर्यानिमीत्ताने गप्पा मारल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेन आणि इतर जलदगती गोलंदाजांचा तोफखाना, आफ्रिकेच्या खेळपट्ट्या यांसमोर भारतीय फलंदाजांची कसोटी लागेल असंही मुरली विजयने मान्य केलं. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय संघ ज्या फॉर्मात आहे ते पाहता, या आव्हानाचा आम्ही नेटाने मुकाबला करु असा आत्मविश्वास मुरली विजयने व्यक्त केलाय. वर्षाच्या सुरुवातीच्या काळात दुखापतीमुळे मुरली विजयला काही सामन्यांना मुकावं लागलं होतं. दुखापतीचं कारण देत मुरली विजयने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला होता. याचसोबत नुकत्यात श्रीलंकेविरुद्ध पार पडलेल्या कसोटी मालिकेत त्याला कोलकाता कसोटीत जागा देण्यात आली नव्हती. मात्र ज्यावेळी संघात संधी मिळाली, तिचा पुरेपूर फायदा उचलत मुरली विजयने शतकी खेळी केल्या. प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर मी ही खेळी करु शकलो असंही विजयने मान्य केलं.
भारतीय संघाच्या कामगीरीकडे लक्ष
2017 वर्षात भारतीय संघाने बहुतांश क्रिकेट हे आपल्या घरच्या मैदानावर खेळलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ चांगली कामगिरी करु शकेल का? असा प्रश्न विचारला असता मुरली विजय म्हणाला, होय नक्कीच, आमचे गोलंदाजही दक्षिण आफ्रिकेला चांगलच नाकीनऊ आणू शकतात. मध्यंतरीच्या काळात संघातल्या अनेकांनी काऊंटी क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे परदेशी खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव आमच्या खेळाडूंकडे आहे. आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्व भारतीयांचं लक्ष असेल.