एक कोटी खर्च; दोन वर्षे मोफत प्रशिक्षण
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 45 खेळाडूंना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खेळाडून दत्तक योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यांना 2 वर्षे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 1 कोटी रूपये खर्चाला क्रीडा समितीने शुक्रवारी मंजुरी दिली.
एकूण 51 अर्ज प्राप्त…
खेळाडू दत्तक योजनेसाठी 21 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2017 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. त्या एकूण 51 अर्ज प्राप्त झाले. त्यातील 45 खेळाडू पात्र ठरले तर, 6 खेळाडू अपात्र ठरले. सदर 45 खेळाडूंना 2 वर्षांसाठी योजनेचा लाभ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. योजने अंतर्गत खेळाडूंना प्रशिक्षण व आहार भत्ता देण्यासाठी एकूण 1 कोटी रूपये खर्च येणार आहे. त्यास समितीने आयत्या वेळी मान्यता दिली.
सेवाशुल्क तत्वावर व्यायामशाळा चालविण्यास मंजूरी…
पालिकेच्या वतीने शहरात 79 व्यायामशाळा चालविला जातात. त्यापैकी 48 व्यायामशाळा दरमहा 2 हजार सेवाशुल्क तत्वावर शहरातील सार्वजनिक संस्था व मंडळांना 11 महिने कराराने चालविण्यास दिलेल्या आहेत. त्यातील 16 व्यायामशाळांनी मुदतवाढीसाठी अर्ज केलेला आहे. त्यापैकी सद्यस्थितीत 15 व्यायामशाळांची मुदत संपलेली असून, सदरच्या सर्व व्यायामशाळा संबंधित संस्थेच्या ताब्यात आहेत. या 15 व्यायामशाळांना 11 महिने कराराने दरमहा सेवाशुल्क पालिकेकडून देऊन सेवाशुल्क तत्वावर चालविण्यास मुदतवाढ देण्यास समितीने मान्यता दिली.