दत्तनगर ते आंबेगाव गावठाण रस्त्याची पाहणी

0

धनकवडी । दत्तनगर चौक ते आंबेगाव गावठाणकडे जाणार्‍या मुख्य मार्गावरील नागमोडी वळण सरळ करणे, तसेच टेल्को कॉलनी ते आंबेगाव बुद्रुक रस्त्याला जोडणे तसेच आंबेगाव रस्ता ते देहूरोड बायपास महामार्गाला दोन ठिकाणी जोडण्याचे काम पुन्हा एकदा स्थानिक नगरसेवकांनी हाती घेतल्याने रस्त्याची समस्या मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. याबाबत महानगरपालिका आयुक्त कुणालकुमार यांच्याशी चर्चा होऊन पथ विभागाच्या अधिकार्‍यांनी जागेची पाहणी केली आहे.

दत्तनगर चौक तसेच जांभूळवाडी रस्त्याला जोडणारे रस्ते तयार न केल्याने किंवा पाठपुरावा न झाल्याने नागरिकांना होणारा मनस्ताप, वाहतूककोंडी, तसेच इंधन खर्च व प्रदूषणाची समस्या निर्माण झाली होती. परंतु या कामांमुळे हे सर्व विषय मार्गी लागणार आहेत. यासाठी स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी रस्त्याची पाहणी केली. या कामाला गती मिळत असल्याचे दिसत येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या रस्त्यात ज्यांची जागा जाणार आहे, त्या जागा मालकांशी बोलणे झाले आहे. जे बाधित आहेत, त्यांना टीडीआर किंवा एफएसआय मिळणार असल्याने नुकसान होणार नाही. रस्ता होऊन वाहतूककोंडी तसेच अडवणूक संपल्यास स्थानिक नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे बेलदरे यांनी सांगितले.