जळगाव। येथील जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर व अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या बदल्या अनुक्रमे नाशिक व वाशिमला झाल्या आहेत. त्याच्या जागी नाशिक व औरंगाबाद येथून नवे अधिकारी जळगावला आले आहेत. जळगावचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती झाली आहे.
मोक्षदा पाटलांना पदोन्नती
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची नाशिक पोलीस अकादमीच्या अधीक्षकपदी झाली आहे.तर अप्पर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांची पदोन्नती होऊन वाशिमच्या जिल्हा पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक पदावर औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणहून आलेले बच्चनसिग यांची नियुक्ती झाली आहे.
कराळेंची अनुभवी कारकिर्द
नवे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलीस दलात लातुर, सातारा, चंद्रपुर, अहमदनगर जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केलले आहेे. एक वर्षभर त्यांनी युनोसाठीही काम केले. युनोच्या कामाची जबाबदारी संपल्यानंतर मुबंई येथे पोलीस उपायुक्त म्हणून 6 वर्षे, ठाणे येथे 2 वर्षे, डोबिवली- कल्याणमध्ये 1 वर्ष काम केलेले आहे. त्यानंतर बढती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातही त्यांनी काम केले. उस्मानाबादनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात व पुढे नाशिकच्या शहर उपआयुक्त पदावरुन आता ते जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आलेले आहेत.
धुळ्यात एम रामकुमारांची नेमणूक
धुळे । धुळ्याचे पोलीस अधीक्षक एस.चैतन्य आणि अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना शासनाने बढती दिली आहे. चैतन्य यांची बढतीवर बदली झाल्याने धुळ्याच्या पोलीस अधीक्षकपदी एम. रामकुमार यांची नियुक्ती झाली आहे. चैतन्य यांची पोलीस उपायुक्त म्हणून नागपूर येथे बदली झाली आहे. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी हे औरंगाबादचे पोलीस अधीक्षक (नाहसं) झाले आहेत. राज्य राखीव पोलिस बल समादेशक एस. आर. दिघावकर यांची नागपूर शहर येथे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य प्रकाश बच्छाव हे अमरावतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार पाहतील. एम.राम कुमार हे नागपूरहून आले आहेत.