दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करणार

0

मुंबई – राज्यातल्या सी.बी.एस.ई. तसेच आय.सी.आय.सी. शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी परिषदेतल्या सदस्यांसह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी ऑगस्ट महिन्यात चर्चा केली जाईल, असे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले.

शुक्रवारी सकाळी विशेष बैठकीत काँग्रेसचे संजय दत्त यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याच्या विषयावर अर्ध्या तासाची चर्चा उपस्थित केली होती. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासननिर्णयही जारी केला. पण, याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्यामुळे आजही सी.बी.एस.ई., आय.सी.आय.सी. व इतर बोर्डांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे वाहावे लागते, असे ते म्हणाले. विक्रम काळे, नागो गाणार, डॉ. नीलम गोऱ्हे, हेमंत टकले आदी सदस्यांनी त्यांचे समर्थन केले.

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी चर्चेला उत्तर दिले. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतला. त्यामुळे राज्याच्या बोर्डाच्या शाळांमधल्या ९४ टक्के ओझे कमी झाले. हे प्रमाण ९९ टक्क्यांपर्यंत वाढले असते. परंतु, मुंबई आणि ठाण्यातल्या काही शाळा सी.बी.एस.ई. आणि आय.सी.आय.सी. बोर्डाबरोबरच्या स्पर्धेत निर्णयाची काटोकोरपणे अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे अशा शाळांचे समुपदेशन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. सी.बी.एस.ई. तसेच आय.सी.आय.सी.सारख्या केंद्रीय बोर्डांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याबरोबर इथल्या सदस्यांसह येत्या महिन्यात एक बैठक घेण्यात येईल, असेही तावडे म्हणाले.