दप्तर तपासणीसाठी समिती गठीत

0

जळगाव– शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन मर्यादेपेक्षा अधिक असल्यामुळे शारिरीक वाढीवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे मनपा हद्दीतील शाळांमधील विद्यार्थ्यामच्या दप्तरांची तपासणी करण्यासाठी समिती गठीत केली असून तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत शासनस्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. मात्र बहुतांश शाळांकडून या निर्णयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. दप्तराच्या ओझ्यामुळे पाठीचा त्रास, मानसिक ताण, मान दुखणे, शारिरीक वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे दप्तराचे वजन कमी करण्यासाठी आणि शासनाच्या आदेशाचे पालन केले जात आहे की, नाही यासाठी मनपाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीअंती दप्तरांचे वजन अधिक असल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाणार आहे.
मनपाच्या पथकाकडून होणार तपासणी
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन मोजण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत प्रशासन अधिकारी पी.पी.रामोळे, चंद्रकांत वांद्रे, अनिल बिर्‍हाडे, मीना चौधरी, प्रगती चोनकाळे यांचा समावेश आहे.पाच जणांचे हे पथक तपासणी करुन आयुक्तांकडे अहवाल सादर करतील. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित शाळांवर कारवाई केली जाणार आहे.