दप्तर: फॅन्टसीच्या अंगाने खुललेली किशोर कादंबरी

0

का दंबरीकार अशोक कोळी लिखित दप्तर या नव्याकोर्‍या कांदबरीचे रविवार 12 नोव्हेंबर 2017 रोजी जामनेर येथे मा. कौस्तुभ दिवेगावकर, शशिकांत हिंगोणेकर, डॉ. किसन पाटील व आबा महाजन यांच्याहस्ते होत आहे. त्यानिमित्ताने दप्तरची थोडक्यात ओळख. कवी लेखक व शिक्षक म्हणून ज्यांची तुम्हा आम्हा सर्वांना ओळख आहे. त्या अशोक कौतिक कोळी यांच्या नवीकोरी कादंबरी म्हणजे दप्तर. दप्तर ही तशी फॅन्टसीच्या अंगाने खुललेली किशोर कादंबरी, फॅन्टसीचे दोन अर्थ आहेत. वास्तवापेक्षा वेगळे असे कल्पित विश्‍व म्हणजे फॅन्टसी होय किंवा विलक्षण अशा कल्पना नाही फॅन्टसी म्हटले जाते. दप्तरची 97 ते 144 पर्यंतची पानं जेव्हा ती वाचत होतो तेव्हा मला इसाप आठवला. कारण या रसायने इसापनीति ग्रंथाद्वारे जी जीवनावश्यक सत्य गोवली ती पशुपक्ष्यांच्या माध्यमातून, तीही छोट्या गोष्टीद्वारे असो. दप्तरमध्ये अशोक कोळी यांनी बकरी, माकड, वाघ, कावळा, पोपट, कुत्रा यांच्याद्वारे कांदबरीच कथानक ज्या फॅन्टसीच्या मार्गाने पुढे नेलेय तो भाग इसापच्या गोेष्टींची आठवण करून देणारा असो. मिलिंद हा तिरमक कल्पनाबाई या मजूर नवरा बायकोच्या खोडकर, वात्रट व शाळेत न जाणारा मुलगा. अभ्यासाव्यतिरिक्त तो इतर उचापत्या करण्यात तसा तरबेज पण एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे लहान लेकरांच्या संवेदनशील, भावुक मनाला जे भावलं ते सर्व तो कधी आनंदाने, कधी चतुराईने, तर कधी मिश्किलपणे वा खोडकरपणे टिपून घेण्याचा प्रयत्न करतो. मिल्या हा असाच वेगळा मुलगा. निसर्ग, पशुपक्षी आणि एकूण परिसराचा सच्चा सुगंध घेत वाढणारा अस्संल पोरगा! शाळेत न जाणार्‍या या मिल्याची जेव्हा नकळत त्याच्या शिंदे मास्तरांशी दोस्ती होती तेव्हा त्याला शाळेसह सर्व शैक्षणिक, सांस्कृतिक गोष्टींची ओळख होत मजा वाटायला लागते. इथे एक वेगळा मुद्दा मला शिंदे मास्तरांच्या निमित्ताने मांडायचाय. प्रत्येक शिक्षक हा जातिवंत शिक्षक असतोच. पण तो विद्यार्थ्यांचा पालकही असतो. दोन्ही भूमिका तो एकाचवेळी बजावत असतो. किंबहुना तो पालक अधिक असतो. त्याची दुसरी बाजू अजून एक आहे. शिक्षणानिमित्ताने जवळ असलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे करून घेणे, त्यांच्यातल्या सुप्त गुणांना विकासासाठी वाव देणं, एकूण त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करणं, तो एक परिपूर्ण नागरिक बनेल या दृष्टीनं त्याच्या वाढीकडं लक्ष पुरवणं ही शिक्षकाची दुसरी बाजू. मिल्याबाबत शिंदे मास्तर ही दुसरी बाजू जशी छानसी समजावून घेतात तशी आज इतर मास्तरांनीदेखील समजावून घेण्याची खरंच गरज आहे. प्रश्‍न उभा राहतो काम करण्यासाठी गाव सोडण्याचा शेवटी मिल्या आईबाबांसाठी, पोटासाठी शाळेचा रामराम ठोेकतो, आपल्या शिक्षक पेशाचं भाज ठेवत कांदबरीकार अशोक कोळी यांनी आखीव-रेखीव पद्धतीनं कांदबरीची जी रचना केलीये ती खरंच वाचनीय आहे. दुसरी गोष्ट मराठीत खूपसे कांदबरीकार, उदाहरणार्थ राजन खान वगैरे हे स्टोरी टेलर आहेत. कोळीदेखील त्यात मोडतात. कारण गोष्ट सांगायची तर ती रंगवून, दळून सांगायची ही त्यांची खासियत! असो. अगोदर म्हटल्याप्रमाणे अशोक कौतिक कोळी यांनी फॅन्टसीच्या अंगाने फुटलेली ही दप्तर कांदबरी किशोरांप्रमाणेच सर्वांसाठी वाचनीय आहे. शालेय जीवनाला न्याय देणारी म्हणूनच वेगळी आहे.
-चंद्रकांत भंडारी, जळगाव