उल्हासनगर । शहरातील मुस्लिम समाजाचे गेल्या 16 दिवसांपासून दफनभूमीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. असे असताना महापौर मीना आयलानी यांनी 16 एप्रिलला हा विषय महासभेत चर्चेला घेऊ, असे आश्वासन मुस्लीम समाजाला दिले. यामुळे चिडलेल्या उपोषणकर्त्यांनी पालिका मुख्यालयासमोरच भाजपच्या महापौरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार आणि पालिकेच्या महासभेतील ठरावानुसार हा भूखंड दफनभूमीसाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. या भूखंडात 2 शव दफन केल्यानंतरही नव्या विकास आराखड्यात या भूखंडाचे आरक्षण बदलून त्यावर सार्वजनिक उपयोगाकरिता असे आरक्षण टाकण्यात आलेले आहे.
या भूखंडाच्या मागणीसाठी काँग्रेसचे अमर जोशी यांनी 5 दिवस उपोषण केले. त्यानंतर त्यांच्या उपोषणाला इतर संघटनांनी पाठिंबा दिल्याने पोलिसांच्या दबावाने साखळी उपोषण सुरू आहे. सोमवारी मुस्लीम समाजाचे पाच कार्यकर्ते पालिका मुख्यालयाच्या गेटवर मुंडन करून निषेध करणार होते. यामुळे वातावरण चिघळेल, अशी शक्यता पोलिसांना वर्तवल्याने आयुक्त गणेश पाटील, महापौर मीना आयलानी, उप महापौर जीवन ईदनानी, सभागृह नेता जमनादास पुरस्वानी, विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे यांच्या बरोबर शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य शासनाला दफनभूमीचा समस्येसाठी कळवण्यात येणार असून, न्यायालयात मुस्लीम समाजाच्या बाजूने मत मांडणार असल्याच्या पुनरोच्चार केला. तसेच कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी भागात दफनभूमीसाठी भूखंड देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. उर्वरित भूखंड झोपडपट्टी व्याप्त असल्याने तो ही देण्यासाठी 16 एप्रिलला महासभा बोलावू, असे आश्वासन महापौर मीना आयलानी आणि त्यांच्या सहकार्यांनी दिले. या आश्वासनानंतर मुंडन आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, अशा प्रकारे आश्वासन देऊन मुस्लीम समाजाची चेष्टा केल्याचे मत बैठकीत समोर आले.
शासनाविरोधात घोषणा
मंगळवारी सायंकाळी महासभा सुरू झाल्यानंतर चिडलेल्या मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयाच्या गेटवर महापौर मीना आयलानी यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यावेळी प्रशासन आणि शासन या दोघांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. पुतळा जाळून झाल्यावर पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकानी पालिका गेटवर गर्दी करून नगरसेवक आणि पालिका कर्मचारी यांना बाहेर पडू देणार नाही, असा मानस व्यक्त केल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. महासभा सायंकाळी उशिरापर्यंत चालू होती.