दमदाटी करणार्‍या अधिकार्‍याची उचलबांगडी

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी काम करणर्‍-या विशेष कार्य अधिका-याने वायसीएमएचच्या वैद्यकीय अधीक्षकाला दमदाटी केली होती. ही दमबाजी त्याला चांगलीच भोवली. कोणाचेही बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाणार नाही. बघून घेईल ही भाषा डॉक्टरांना शोभत नसून ज्या अधिकार्‍यामुळे वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता मिळण्यास उशीर झाला. त्यांच्यामुळे वायसीएममधील वातावरण दूषित होत असेल तर अशा अधिकार्‍याला शासनसेवेत परत पाठवा. याविषयीचा प्रस्ताव पुढील समितीसमोर ठेवण्यात यावा, अशा सूचना स्थायी समितीने प्रशासनास केल्या.

नादाला लागाल, वाट लावीन
डॉ. पद्माकर पंडित असे त्याचे नाव आहे. कर्तव्य रजा मंजूर केली नाही त्याने ‘माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघून घेईन’. माझ्या नादाला लागाल तर मी सगळ्यांची वाट लावीन, अशी धमकी दिली असल्याचे पत्र वायसीएमएच रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांनी आयुक्तांना दिले होते. तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी आणि त्याची महापालिकेतील सेवा समाप्त करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर वायसीएममधील कर्मचार्‍यांनी या प्रकाराचा निषेध केला होता. या प्रकरणाचे पडसाद बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत उमटले.

नियुक्तीची मुदत समाप्त
प्रशासनाकडून डॉ. पंडित यांची माहिती मागवून घेतली. त्यानंतर सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि डॉ. अनिल रॉय यांनी पंडित हे मानधन तत्वावर आहेत. त्यांची मुदत संपली आहे, असे सांगितले आहे. पंडित यांची आवश्यकता नसल्याचेही प्रशासनाने यावेळी सांगितले. त्यानंतर याविषयी पुढील सभेत कारवाईचा प्रस्ताव ठेवावा, अशी मागणी सदस्यांनी केली.