शेतकर्यांना पेरणीलायक दमदार पावसाची प्रतीक्षा
भुसावळ- जुन महिना संपुष्टात येत असला तरी तालुक्यात पेरणलायक पावसाने दमदार हजेरी न लावल्याने शेतकर्यांनीही पेरणीसाठी हात आखडता घेतल्याने तालुक्यातील पेरणी प्रक्रिया खोळंबली आहे. यासाठी शेतकर्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे तर तालुक्यातील पेरणीचा कृषी विभागानेही सोमवारी अहवाल घेतला. तालुक्यातील शेतकर्यांनी उन्हाळ्यातच पेरणीपूर्व शेतीची मशागतीचे काम आटोपते घेतले आहे शिवाय पेरणीसाठी शेतकरी वर्गाने आवश्यक त्या बियाण्यांची खरेदी केली असून पेरणीची पूर्ण तयारी केली आहे मात्र तालुक्यात समाधानकारक पावसाने हजेरी न लावल्याने शेतकर्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. तालुक्यात जून महिना संपुष्टात आला असूनही दमदार पाऊस नसल्याने शेतकर्यांनी दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पेरणीसाठी हात आखडता घेतल्याने पेरणी प्रक्रीया खोळंबली आहे.
बागायती व जिरायती पेरणी अशी
याबाबत तालुका कृषी विभागानेही सोमवारी तालुक्यातील खरीप हंगामातील पेरणीचा आढावा घेतला. यामध्ये तालुक्यातील 43 हजार 138 हेक्टर क्षैत्रापैकी पाच हजार 23 हेक्टरवर बागायती तर दोन 787 हेक्टरवर जिरायत कापूस, खरीप ज्वारी 902, उडीद 370, मुग 362, सोयाबीन 336, मका 667 तर नवीन केळी 82, भुईमूग 62, ऊस 22, तूर 308 अशा प्रकारे एकूण 13 हजार 411 हेक्टरवर पेरणी झाली असल्याचे कृषी विभागाने सोमवारी सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.
अशी आहे तालुक्यातील भौगोलिक स्थिती
तालुक्याचे भौगोलिक क्षैत्र-43 हजार 138 असून खातेदार संख्या 39 हजार 663 आहे. यामध्ये वहितीलायक क्षैत्र – 28 हजार 559 असून पडीत क्षेत्र- 313.13 हेक्टर तर वनक्षेत्र दोन हजार 960 असे आहे तसेच कुरण क्षेत्र-360 हेक्टर असून सिंचन विहिरींची संख्या चार हजार 110 अशी असून बागायती क्षेत्र चार हजार 510 हेक्टर असे आहे.
कृषी विभागाची आढावा बैठक
सोमवारी तालुका कृषी कार्यालयात कृषी सहायक व कृषी सेवकांची आढावा बैठक झाली. बैठकीत तालुक्यातील शेत पेरणीचा आढावा घेण्यात आला असून पावसाळा लांबल्यास काय उपाययोजना करता येतील? यावर विचार-विनीमय झाला. शिवाय शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहनदेखील करण्यात आले.