दमदार पावसामुळे लावणीला वेग

0

रत्नागिरी । यंदा प्रारंभी समाधानकारक बरसणार्‍या पावसाने गेला आठवडाभर कोकणात दमदार हजेरी लावल्याने आता शेतीच्या कामांना वेग आला असून साधारण: भात लावणीची 20 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नजिकच्या काळातही चांगला पाऊस झाला तर येत्या पंधरवड्यात जिल्ह्यातील भात लावणीची कामे 100 टक्के पूर्ण होतील, अशी आशा शेतकरी व कृषी खात्याकडून व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यतः भाताचे पीक घेतले जाते. पण, कोकणातील ही भाताची शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. भात लागवडीसाठी चांगल्या पावसाची गरज असते. त्यामुळे सुरुवातीला चांगला झालेल्या पावसाने मधल्या काळात ओढ दिली होती. त्यानंतर गेल्या सोमवारपासून जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर पकडल्याने बळीराजा सुखावला असून, आता भात लावणीच्या कामांना वेग आला आहे.