दयाबेनचा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेला रामराम

0

मुंबई । टीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका ’तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ’दयाबेन’ची भूमिका निभावणारी दिशा वकानी मालिका सोडणार असल्याची चर्चा आहे. सप्टेंबर महिन्यापासून ती या मालिकेत दिसत नाहीए. एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर आता ’दयाबेन’ खर्‍या आयुष्यातल्या आईच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी मालिका सोडणार असल्याचे म्हटले जातेय. मालिकेच्या निर्मात्यांनी मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

बाळंतपणानंतर शूटिंगला परतलीच नाही
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात दिशाला मुलगी झाली. बाळंतपणाच्या रजेवरून ती अद्याप परतलेली नाही. तिला सध्या तिच्या मुलीकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे ती मालिकेला कायमचा रामराम ठोकणार असल्याचे म्हटले जात आहे. तिची भूमिका मालिकेत महत्त्वाची होती. त्यामुळे ’दयाबेन’च्या अनुपस्थितीत मालिकेचा टीआरपी घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. प्रत्यक्षात मात्र मालिकेचा टीआरपी कायम राहिला. दिशा वकानीने अद्याप तिच्या निर्मात्यांना तिच्या मालिकेत न परतण्याबाबतचा अंतिम निर्णय कळवलेला नाही.

मालिकेच्या टीआरपीवर परिणाम
निर्माता असित कुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ’दिशाची मुलगी खूपच लहान आहे आणि तिला आईची गरज आहे. आम्ही अद्याप तिच्या परतण्याबाबत तिच्याशी चर्चा केलेली नाही. ती मालिका सोडणार का हेही अद्याप निश्‍चित ठरलेले नाही.’ नोव्हेंबर 2015 मध्ये सीए मयुर पाडिया यांच्याशी दिशाचे लग्न झाले. ’तारक मेहता का उल्टा चष्मा’ 2008 मध्ये सुरू झाली. मालिकेच्या सुरुवातीपासून दिशा ’जेठालाल’च्या पत्नीची – दयाबेनची भूमिका साकारत आहे. तिच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे ती अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.