शासनाच्या आदेशाला केराची टोपली : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
नारायणगाव । पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात खासगी हॉस्पिटलमध्ये घेत असलेले बाह्यरूग्ण व आंतररूग्ण यांच्याकडे आकारण्यात येणारी फी नमूद करणारे दरपत्रक प्रत्येक रुग्णालयाच्या व क्लिनीकच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे. असे असतानाही अद्यापही रुग्णालयांमध्ये फलक लावण्यात आलेले नाहीत. फलक न लावणार्या ग्रामीण व शहरी भागातील सर्व नर्सिंग होम, हॉस्पिटल व मॅटर्निटी होमची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कायदेशीर तपासणी कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र राज्य प्रांत संघटनमंत्री व शासनाच्या ग्राहक संरक्षण परिषदेचे जिल्हा सदस्य बाळासाहेब औटी यांनी केली.
पुण्यातील विधानभवनात सोमवारी झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, पोलिस, आर.टी.ओ, गॅस, वीज आदी खात्यांचे खातेप्रमुख व ग्राहक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नोंदणीकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष
मुंबई सुश्रुषागृहे नोंदणी अधिनियम 1949 अंतर्गत सर्व नर्सिंग होम, हॉस्पिटल व मॅटर्निटी होम यांना जिल्हा परिषदेकडे नोंदणी करणे व केलेल्या नोंदणीचे दरवर्षी नूतनीकरण करून घेणे बंधनकारक आहे. परवानगीशिवाय हॉस्पिटल चालवता येत नाही ते बेकायदेशीर आहे. पुणे जिल्ह्यात बहुतेक रुग्णालयांची नोंदणी झालेली नाही. याकडे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, असा आरोप औटी यांनी बैठकीत केला आहे.
रुग्णालयांची तपासणी
केंद्र सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने खासगी रुग्णालयामध्ये सिझेरियन व नैसर्गिक प्रसृती किती झाल्या आहेत. याच्या नोंदीचा फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश असताना लावण्यात आले नाहीत. याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घ्यावी, अशी मागणी परिषदेत औटी यांनी केली. सर्व हॉस्पिटलची तपासणी करून दोषींवरती गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दौलत देसाई यांनी सांगितल्याची माहिती औटी यांनी दिली.
दरपत्रक भरून देणे बंधनकारक
जिल्हा परिषदेकडे रूग्णालय नोंदणी करत असताना नोंदणी अर्जामध्ये बाह्यरूग्ण व आंतरुग्णांसाठी आकारले जाणारे चार्जेस नमूद करणारे दरपत्रक भरून देणे बंधनकारक आहे. ज्यांनी जिल्हा परिषदेची नोंदणी करून घेताना दरपत्रक भरून दिलेले आहे. मात्र, प्रत्यक्षात दरपत्रक दर्शनी भागात लावलेले नाही. अशा नोंदणीकृत व अनोंदणीकृत रुग्णालयांनी नोंदणी करून रूग्णालयांच्या दर्शनी भागात फलक लावावेत. रुग्णांना वाचण्यास सुलभ अशा मराठी भाषेत डॉक्टरांचे संपूर्ण नाव, कौन्सीलचा नोंदणी नंबर व हॉस्पिटलचा नोंदणी नंबर व शिक्षण घेतलेल्या पॅथीचे नाव, पॅथीनुसार पदवी, उपलब्ध सुविधांचे नावासह दरपत्रक लावण्यात यावे. ज्यांनी दरपत्रक लावले नाही अशा नोंदणीकृत व अनोंदणीकृत हॉस्पिटलची तपासणी करून फलक न लावणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.