दरमहा सहा हजार लीटरपर्यंत पिण्याचे पाणी मोफत

0

पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – शहरातील नळजोडाला मीटर असलेल्या प्रत्येक कुटुंबाला महिन्याला सहा हजार लिटरपर्यंतचे पिण्याचे पाणी मोफत देण्यात येणार आहे. याचा जवळपास एक लाख कुटुबियांना फायदा होईल. त्यासाठी केवळ 200 रुपये सेवा शुल्क आकारण्यात येईल. 1 एप्रिल 2018 पासून याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल. याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय महापालिकेच्या स्थायी समिती सभेत घेण्यात आला. या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा कमी वापर करणार्‍या नागरिकांना फायदा होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी दिली.

एप्रिलपासून अंमलबजावणी
महापालिका प्रशासनाने पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करून तो बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावावर सभेत चर्चा झाली. पाणीपट्टीवाढीसाठी प्रशासनाने प्रस्तावित केलेले दर जास्त असल्याच्या भावना समितीच्या इतर सदस्यांनी व्यक्त केल्या. स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयानुसार दर महिन्याला सहा हजार एक ते 15 हजार लिटर पाण्याचा वापर केल्यास प्रति एक हजार लिटरमागे आठ रुपये, 15 हजार एक ते 22 हजार 500 लिटरपर्यंत पाण्याचा वापर केल्यास प्रति एक हजार लिटरमागे साडेबारा रुपये, 22 हजार 501 ते 30 हजार लिटरपर्यंत पाण्याचा वापर केल्यास प्रति एक हजार लिटरमागे 20 रुपये आणि 30 हजार 1 लिटरच्या पुढे पाण्याचा वापर केल्यास प्रति हजार लिटरमागे 35 रुपये भरावे लागतील.