दररोज बदलणार पेट्रोल, डिझेलचे दर; पाच शहरांमध्ये प्रणाली लागू

0

नवी दिल्ली । अधून-मधून कमी-जास्त होणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार असून देशात ही प्रणाली पुदुच्चेरी, विझाग, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदिगड या पाच शहरांमध्ये प्रायोगिक पातळीवर सुरू करण्यात आली आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद प्रधान यांनी आज याबाबत माहिती दिली. मात्र या निर्णयात केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नसेेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पाच शहरांमध्ये प्रोजेक्ट
जून 2010 मध्ये सरकारने पेट्रोलच्या किंमती नियंत्रण मुक्त केल्या आणि किंमती ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिला. ऑक्टोंबर 2014 पासून डिझेलचे दर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना मिळाला. आता मात्र दररोज आढावा घेण्याचा पायलट प्रोजेक्ट सध्या पुदुच्चेरी, विझाग, उदयपूर, जमशेदपूर आणि चंदिगड या शहरात राबवण्यात येणार आहे. येथे हा प्रयोग यशस्वी ठरल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल.

सध्या 15 दिवसांनी होतो बदल
सध्या दर पंधरा दिवसांनी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरांमध्ये बदल केले जातात. जागतिक बाजारपेठेतील इंधनाचे दर आणि जागतिक स्तरावरील घडामोडी विचारात घेऊन दर पंधरा दिवसांनी पेट्रोलियम कंपन्यांकडून दरांमध्ये बदल केले जातात. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलांच्या किमतींचा आढावा आता दररोज घेतला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतील.

डायनॅमिक फ्युएल प्रायसिंग
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये दररोज होणार्‍या बदलाला डायनामिक फ्युईल प्राईसिंग म्हटले जाते. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाचे दर लक्षात घेऊन त्याच दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जातील. यामुळे भारतातील इंधन दर रचना आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन दर रचनेच्या स्तरावर जाणार आहे. मात्र यामुळे क्लिष्टता वाढणार आहे. दररोज बदलत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होण्याचाही धोका आहे.