पुणे । गणपती विसर्जनाच्या दिवशी विसर्जन घाटावर गणपती विसर्जित करण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट 3234 डीच्या वतीने ‘निर्माल्य दान’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये निर्माल्य संकलन करण्यात येणार असल्याची माहिती विजय बढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संयोजक आनंद आंबेकर, प्रसाद खंडागळे, मुकुंद खैरे, प्रवीण ढोरे उपस्थित होते.
पाण्यात न टाकता दान करा
गणपती विसर्जन करण्यासाठी येणार्या भाविकांनी त्यांच्याजवळील निर्माल्य पाण्यात न टाकता ते दान करावे असे आवाहन आंबेकर यांनी केले. त्यामुळे नदीप्रदूषण होणार नाही. होळकर घाट, संगम घाट, ओंकारेश्वर घाट, विठ्ठल वाडी घाट, दत्तवाडी घाट, औंध घाट, रहाटणी घाट, चिंचवड मोरया गोसावी घाट, गरवाले पूल, राजाराम पुल, भिडे पूल, वडगाव कॅनॉल, मीरा सोसायटी कॅनॉल, अप्सरा थिएटर कॅनॉल, सारसबाग कॅनॉल, कात्रज तलाव, गणेश तलाव आकुर्डी, तळेगाव याठिकाणी ‘निर्माण दान’ हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे खैरे यांनी सांगितले.
शुभारंभ मंगळवारी
यावर्षीच्या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी (दि. 5) विसर्जनाच्या दिवशी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गिरीश मालपाणी, शिरीष मोहिते, डॉ. मिलिंद भोई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उपप्रांतपाल रमेश शहा, ओमप्रकाश पेठे हे देखील उपस्थित राहणार आहेत. मागील चौदा वर्षांपासून लायन्स क्लबच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे बढे यांनी सांगितले.
शहरातील 22 घाटांवर उपक्रम
नदीपात्रात पडणारे निर्माल्य रोखण्याचे तसेच ते गोळा करून त्याबाबत समाजप्रबोधन करण्याचे कार्य क्लबकडून करण्यात येते. यामध्ये शहरातील 22 तर पिंपरीतील 7 घाटांवर क्लबचे पदाधिकारी आणि सभासद निर्माल्य संकलन करतात. दरवर्षी 40 ते 45 टन इतके निर्माल्य गोळा केले जाते. हे निर्माल्य महापालिकेकडे खतनिर्मितीसाठी दिले जाते.