दरा धरणात बुडून तिघांचा मृत्यू

0

शहादा । सातपुडा पर्वतातील पर्यटनस्थळ व गरम पाण्याचा झरा असलेल्या उनपदेव या ठिकाणी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा दरा धरणाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना दि. 9 आगस्ट रोजी घडली, हे तिनही विद्यार्थी शहादा शहरातील असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून धरणातील पोहण्यातील धोक्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गाळात अडकले
मिळालेल्या माहितीप्रमाणे आज दि 9 आगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शहादा शहरातील सात शाळकरी विद्यार्थी सुटी असल्याने उनपदेव या ठिकाणी गेले होते. येथील गरम पाण्याच्या झर्‍यात त्यांनी आंघोळ केली, त्यानंतर परिसरात फेरफटका मारुन सरळ काही अंतरावर असलेल्या दरा धरणाच्या ठिकाणी पाण्यात पोहण्यासाठी गेले. यावेळी त्यांच्यातील तिघे धरणाच्या गाळात अडकुन पडले. त्यांचे मित्र जे बाहेर होते, त्यांनी आपले तिन मित्र पाण्यातुन वर न आल्याने आरोळ्या मारायला सुरुवात केली. स्थानिक आदिवासी पोहण्यात पटाइत असल्याने त्यांनी धाव घेतली. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता. या दुर्घटनेत पाण्यात बुडुन चेतन नामदेव बेलदार ( वय 20, रा. शहादा ), तुषार राजेंद्र अहिरराव ( वय 18 रा. शहादा ) व जयेश सोनवणे ( वय 25) या तिघांचा मृत्यु झाला.

कुटुंबियांचा आक्रोश
पोहणार्‍यांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढली, ही घटना म्हसावद पोलीसांना कळविण्यात आली, पोलीस उपनिरिक्षक दाभाडे पो. कॉ. राजेंद्र काटके प्रदीप राजपुत युवराज पाटील यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. या संदर्भात म्हसावद पोलीसात अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला उशीरा सायंकाळी तिन्ही मुलांचे शव नगरपालिका रुग्णालयात आणण्यात आले. शहादा शहरात या घटनेचे वृत्त कळताच शोककळा पसरली आहे, मयत मुलांच्या नातेवाईकांनी उनपदेव कडे धाव घेत हंबरडा फोडला, एकुण सात जण फिरायला गेले असल्याचे सांगण्यात आले.