जळगाव। शहरापासून जवळच असलेल्या खेडी खुर्द येथे जिल्हा परिषद शाळेजवळ शनिवारी संध्याकाळी इंडिका कार आडवी लावून दोघा संशयीत दरोडेखोरांनी सुनील मंत्री यांच्या मुलाची कार अडविली. कारवर लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला चढवून यश मंत्रीच्या गळ्याला तलवार लावून चार लाख 47 हजार 550 रुपयांची रोकड असलेली बॅग घेऊन पसार झाले होते. काही तासातच दोन्ही संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पोलिस कोठडीस सुनावली होती. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यांना आज न्यायाधीशी एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर केले असता 16 जुन पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
2 लाख 40 हजार रुपयांची रोकड हस्तगत
जळगाव शहरातील उद्योजक सुनील मंत्री यांचा मुलगा यश मंत्री हा खेडी खुर्द येथे वाळू व्यावसायिक विलास यशवंते यांच्या ठेक्यावरून पैसे घेऊन कारने (एमएच- 19, सीडी- 9990) जळगावात येत होता. त्या वेळी खेडी खुर्द गावाजवळील जि. प. शाळेजवळ (एमएच- 15, बीडी- 3717) ही कार आडवी लावून अशोक नामदेव सोनवणे ऊर्फ कन्हैया(रा. खेडी), शंकर ठाकरे(रा. शनिपेठ) या दोघांनी मंत्री यांच्या गाडीच्या तलवारीने काचा फोडल्या. त्यानंतर तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून त्यांच्याकडील 4 लाख 47 हजार 550 रुपये असलेली हिरव्या रंगाची बॅग हिसकावून पळ काढला होता. त्यानंतर पाच तासातच शहर पोलिसांनी दोघांना अटक केले होते. दुसर्या दिवशी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आज त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता त्यांना न्यायाधीश एम.एम.चौधरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्या. चौधरी यांनी दोन्ही संशयितांना 16 जुनपर्यंत वाढीव पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, दोन्ही संशयितांकडून पोलिसांनी 2 लाख 40 हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली असून उर्वरित रक्कम अजून संशयितांनी काढून दिलेली नाही. याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. निखील कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.