कोथरुडमधील दरोड्याचा पर्दाफाश ; निंबोल दरोड्याचाही संशय ; 10 लाखांचे लांबविले होते दागिणे
जळगाव : रिव्हाल्वरचा धाक दाखवून पुणे शहरातील कोथरुडमधील पेठे ज्वेलर्समधून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची घटना 24 नोव्हेंबर रोजी भरदिवसा घडली होती. या दोघा संशयितापैकी एकाने गोळीबारही केला होता. या गुन्ह्यात मध्य प्रदेश, दिल्ली व गुजरातमध्ये वास्तव्य करुन सतत मोबाईल बदलवून जळगाव तसेच पुणे पोलिसांना चकवा देणार्या जळगाव पोलीस दलातील बडतर्फ कर्मचारी सुशील अशोक मगरे (रा.पहूर, ता. जामनेर) व त्याचा साथीदार नीतीश उर्फ अमित प्रसाद चौधरी (20, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव, मुळ रा.बिहार) या दोघांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी अहमदाबाद येथून मुसक्या आवळल्या. पोलीसच गुन्हेगारांवर कसे वरचढ ठरतात, ते या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांच्या कामगिरीने सिध्द झाले आहे. विशेष म्हणजे तंत्रज्ञानात दोन पावले पुढे असलेल्या पुणे पोलिसांना मागे टाकून जळगाव पोलिसांनी अगदी चित्रपटात शोभेल असे हे ऑपरेशन फत्ते केले आहे. अटक करण्यात आलेल्या याच निलंबित पोलीस कर्मचार्यासह त्याच्या साथीदारानेच निंबोल येथे बॅँकेवर दरोडा तसेच व्यवस्थापकाचा खून केल्याचा गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय असून त्याअनुषंगाने त्याची चौकशी करण्यात येत आहे.
सीसीटीव्ही फुटेज, दुचाकीवरुन सुशील मगरे झाला निष्पन्न
पुणे शहरातील कोथरुड येथे 24 नोव्हेंबर रोजी भरदिवसा दुपारी साडे चार वाजता पेठे ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात दोघांनी प्रवेश करुन गावठी पिस्तुल मंगेश वेदक यांच्या दिशेन रोखला. त्यानंतर या दोघापैकी एकाने फायरही केला. त्यानंतर ‘गप बसायचं, आवाज नाय पाहिजे, हात वर करायचे आणि सोन्याचा सगळा माल काढून खाली ठेवायचा आवाज केला तर गोळी घालेन’ अशी धमकी देत दुकानातून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते. याप्रकरणी मंगेश मनोहर वेदक (रा.काळभोरनगर, कोथरुड, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन कोथरुड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेज व दुचाकी यावरुन सुशील मगरे निष्पन्न झाला होता. तेव्हापासून जळगाव व पुणे पोलीस मगरे व त्याच्या साथीदाराच्या शोधात होते.
कोल्हे हिल्स परिसरातील एकाच्या घरात लपविले होते दागिणे
पुणे दरोडा टाकण्यासाठी नियोजनानुसार संशयित नीतीश चौधरी याने जळगावातील गोलाणी मार्केटमधून दुचाकी चोरली. बनावट चावी तयार करुन तिच्या सहाय्याने दुचाकी घेऊन नीतीश थेट पहूरला सुशील मगरे कडे गेला. नंबर प्लेट बदल केल्यानंतर दोघांनी दुचाकीने पुणे गाठले. दोघांनी परिसराचा अभ्यास करुन घटनेला अंजाम देवून कोथरुडमधील पेठे ज्वेलर्समधून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. दरोड्यानंतर चोरलेली दुचाकी याच परिसरात सोडून तेथून दोघांनी बसने जळगाव गाठले. यानंतर दरोड्यातील दागिणे जळगावातील कोल्हे हिल्स परिसरातील एका ओळखीच्या व्यक्तीच्या घरात ठेवले. पोलिसांनी दरोड्यातील 51 सोन्याचे हार संबंधित व्यक्तीच्या घरातून ताब्यात घेतले.
जळगाव-पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन सुशील मगरे’
सुशील मगरे पोलीस दलात होता. त्यामुळे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पध्दत व पोलिसांची तपासाची पध्दत व मर्यादा त्याला माहित होत्या. त्यामुळे त्याने अत्यंत चलाखीने गुन्हा करुन महिनाभर पोलिसांना चकवा देत राहिला. मध्य प्रदेश, दिल्ली व गुजरातमध्ये वास्तव्य करुन तो सतत मोबाईल बदलवून काही जणांच्या संपर्कात होता. त्यानुसार त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी 2 डिसेंबरपासून जळगाव व पुणे पोलिसांचे ‘ऑपरेशन सुशील मगरे’ सुरु झाले होते. तीन दिवसापासून या ऑपरेशनला वेग आला होता. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी यासाठी स्वतः कार्यालय सोडून एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार केला होता. उगले व नवटके या बडोद्याचे पोलीस आयुक्त अनुपमसिंग व सह पोलीस आयुक्त के.जी.भाटी यांच्याही सतत संपर्कात होते.
कर्जबाजारी झाल्यानंतर आला बडतर्फ पोलिसाच्या संपर्कात
सुशील मगरे व नीतीश याची ओळख मुकुंद सुरवाडे याच्या माध्यमातून झाली. नीतीश हा जुगारात दीड लाख रुपये हरला होता. कर्जबाजारी असल्याने तो पैशाच्याच शोधात होता. तेव्हा मगरे याने तु दुचाकी चोरुन आण, पुढचे मी बघतो असे सांगून नीतीशला दुचाकी चोरायला लावली. सुरवाडे याच्याविरुध्द दुचाकी चोरीचे गुन्हे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुणे दरोडा व जळगावातील दुचाकी चोरीत दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झालेला आहे तर निंबोल दरोड्यात सहभाग आहे किंवा नाही याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
पुणे पोलिसांना मागे टाकत जळगाव पोलिसांचे ऑपरेशन फत्ते
तंत्रज्ञानात तज्ज्ञ असलेले विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांच्या पथकाजवळच त्यांनी ठाण मांडले तर बाहेर पाच पथके पाठविली होती. प्रत्येक पथकावर जबाबदारी निश्चित करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये बडोदा येथे उपनिरीक्षक विकास पाटील, राजेश मेढे, संजय हिवरकर, विजय शामराव पाटील, भगवान पाटील, सचिन महाजन तर त्यांच्या दिमतीला गुजरातचे पोलीस होते. जळगाव शहरात मगरे ज्यांच्या संपर्कात होता, त्यांच्या कोल्हे हिल्स परिसरातील घरावर सहायक फौजदार रवींद्र गिरासे, विजयसिंग पाटील, जयंत चौधरी, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, नंदलाल पाटील, श्रीकृष्ण पटवर्धन, प्रदीप पाटील, महेश पाटील व प्रवीण हिवराळे तर महाबळमध्ये अनिल इंगळे, संतोष मायक ल, रमेश चौधरी, किरण चौधरी, तिसरे पथक अशोक महाजन विनय देसले, रमेश जाधव, ललिता सोनवणे, मिनल साकळीकर, वैशाली सोनवणे व वैशाली पाटील एमआयडीसीत सापळा लावून होते. जामनेरचे उपनिरीक्षक विकास पाटील, निंभोर्याचे उपनिरीक्षक योगेश शिंदे यांचीही यात मदत घेण्यात आली.