जळगाव। दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. शुक्रवारी रात्री पावणे बारा बाजेच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील के सेक्टरजवळील खदाणीजवळ दरोड्याच्या प्रयत्नातील दरोडेखोरांचा पाठलाग करून पोलिसांना त्यांना पकडले. यावेळी त्यांच्याकडून मोबाईल, दोर, चाकु तसेच मिरचीपुड असे दरोड्यास लागणारे साहित्य मिळून आले आहे. पाचही जणांना पोलिसांनी अटक केली असून शनिवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
दरोडेखोरांकडे मिरची, चाकु, दोरी
पकडलेल्या पाचही दरोडेखोरांची अंगझडती पोलिसांनी घेतली. तेव्हा त्यांच्याकडे मिरचीची पुड, चाकू, लोखंडी गज, नायलॉन दोरी, मोबाईल, टॉमी आदी दरोडा टाकण्यासाठी उपयुक्त असणारे साहित्य आढळुन आले. पोलिसांनी साहित्यांसह पाचही जणांना ताब्यात घेत आपल्या पोलिस खाक्या दाखवताच दरोडेखोर पोपटा सारखे बोलू लागले. दरम्यान, पोलिसांनाकडून पाचही जणांची कसून चौकशी करीत असून संशयितांकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येवू शकतात. पाचही दरोडेखोरांना शनिवारी दुपारी न्यायाधीश बी.डी.गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात कामकाज होवून न्यायाधीश गोरे यांनी पाचही संशयित दरोडेखोरांची 27 ऑगस्टपर्यंत एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, चोरट्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी पाठलाग करून दरोडेखोरांना पकडले
गेल्या काही दिवसांपासून एमआयडीसी परिसरात मारहाण करून लुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्येक घटनांवर पोलिसांतर्फे विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यातच शुक्रवारी पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना चार ते पाच जण दरोड्याच्या प्रयत्नात असून ते एमआयडीसी परिसरातील के सेक्टरजवळील खदाणीनजीक लपून बसलेले असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती सांगळे यांनी पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांना त्वरीतक कळविताच पोनि. कुराडे यांनी पोलिस उपनिरिक्षक रोहन खंडागळे, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, विजय पाटील, अविनाश देवरे, असीम तडवी अशांच्या पथकाला दरोडेखोरांना पकडण्यासाठी पाठविले. खंडागळे यांनी पोलिसांना ताफा घेवून शुक्रवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास एमआयडीसी के सेक्टर परिसरातील खदाणीजवळ सापळा लावला. दरम्यान, खदाणीजवळील ररस्त्याच्या आडोशाला काही दरोडेखोर असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांचे वाहन पाहताच दरोडेखोरांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांनी पाचही जणांचा पाठलाग करून पकडले. त्यात सुरेश पुंडलिक ठाकरे (रा.जैनाबाद), धर्मेंद्र प्रकाश भावसार (रा.कांचननगर), संदिप अमृत पाटील (रा.शनिपेठ), परशुराम विलास पाटील (रा.लक्ष्मीनगर), रविंद्र रमेश जगताप (रा.शिवाजीनगर हुडको) या दरोडेखोरांचा समावेश आहे. या पाचही जणांना अटक करण्यात येवून त्यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.