दरोड्याचा डाव उधळला ; गावठी कट्ट्यासह एक दरोडेखोर जाळ्यात

0

टीटाणे गावाजवळ निजामपूर पोलिसांची कारवाई ; पाच दरोडेखोर पसार

निजामपूर- दरोड्याच्या टाकण्याच्या उद्देशाने झाडाच्या आडोशाला लपलेल्या टोळीला गस्तीवरील पोलिसांनी पकडले मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पाच जण निसटले असलेतरी एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले असून आरोपीच्या ताब्यातून दरोड्याच्या साहित्यासह दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. संतोष नामदेव भोसले (50, जामदा, ता.साक्री, जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना वर्तवली.

गस्तीदरम्यान दरोड्याचा डाव उधळला
पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, हेमंत मोहिते व सहकारी बुधवारी रात्रीच्या गस्तीवर असताना निजामपूर हद्दीतील टिटाणे गावाजवळील जामदा रस्त्यावर काही संशयीत दरोड्याच्या उद्देशाने झाडाच्या आडोशाला लपल्याचे कळाल्यानंतर पथकाने धाव घेतली. संशयीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळू लागल्यानंतर त्यांचा पाठलाग केल्यानंतर एका आरोपीला पकडण्यात यश आले. आरोपीची विचारपूस केल्यानंतर त्याने आपले नाव संतोष भोसले (50, जामदा) असे सांगितले. आरोपीच्या अंगझडतीत 10 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा, मोबाईल, कटर, लोखंडी सुरा तसेच घटनास्थळावरून दोन दुचाकी मिळून 96 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक हेमंत मोहिते, पिंजारी, बागुल, ठाकरे, राठोड, शेंडगे, अहिरे, अपर पोलीस अधीक्षक पानसरे यांच्या पथकातील हवालदार शिरसाठ, सानप, जाधव, पाटील यांनी कारवाई केली. आरोपीविरुद्ध निजामपूर पोलिसात अशोक भिला चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.