हिंजवडी : बावधन येथील एका बंगल्यामध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांच्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींपैकी एकजण सराईत आरोपी आहे. त्यांच्याकडून तलवार आणि कोयत्यासारखी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. समीर उर्फ पप्पु गुजर (वय 28, रा. मुळशी), किरणकुमार पिल्ले (वय 21), अजितेश चव्हाण (वय 19), विनायक उर्फ सुनील राऊत (वय 26) व रितेश शिंदे (वय 20, चौघे रा. पिरंगुट) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई हिंजवडीचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी, निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, उपनिरीक्षक अशोक गवारी, वरुडे, वलटे, कर्मचारी किरण पवार, प्रमोद पवार, आतिक शेख, कुणाल शिंदे, श्रीकांत चव्हाण, सुभाष गुरव, झनकसिंग गुमलाडु, अमर राणे यांच्या पथकाने केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या हद्दीमध्ये सोमवारी रात्री गस्त घालत होते. रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांना मुंबई-पुणे महामार्गावर रामनगर कॉलनीमध्ये काही तरुण संशयितरित्या थांबल्याचे दिसले. पोलिसांनी हिंजवडी तपास पथकातील पोलिसांना तात्काळ बोलावून घेतले. पोलिसांची चाहूल लागताच संशयित तरुण पळून जाण्याचा तयारीत असताना परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. तरुणांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तलवार, कोयता, लोखंडी फायटर, स्प्रे असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी सर्व ऐवज जप्त करत त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी बावधन येथील एका बंगल्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.