चाकण : दरोडा टाकण्याच्या हेतूने आलेल्या सहा जणांच्या सशस्त्र टोळक्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने चित्रपटामध्ये शोभेल असे थरारक पद्धतीने पाठलाग करून चाकण येथे सोमवार सकाळी 11 च्या दरम्यान अटक केली. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने परिसरात बघ्यांची गर्दी झाली त्यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण मधील एका सराफ व्यावसायिकावर दरोडा टाकण्याच्या इराद्याने टोळी येणार असल्याची खबर मिळाल्यानंतर गुन्हे अन्वेषण पथकाने चाकण येथील तळेगाव चौकात सापळा लावला. काही वेळातच राजस्थान पासिंगच्या कारला थांबण्याचा इशारा केला मात्र गाडी न थांबता वेगात पुढे निघाली. संशय बळावल्याने पाठलाग करून काही अंतरावर सदर गाडी अडविली असता त्यातील काळूराम चेलाजी प्रजापती ( वय 30 ,सध्या रा.संगमनेर ,मूळ गाव बलवना जि.पाली राजस्थान ) लालसिंग चौहान ( वय 29 ,सध्या रा.पाडळी वापी जि.बलसाड ,मूळ रा. कोरटा ,जि.पाली राजस्थान ) गुमानराम उर्फ रमेश ठानाराम सरगडा ( वय 28 ,सध्या पाडळी ,वापी मूळ रा.बीलोलीया जि.पाली राजस्थान ) वीरेंद्र उर्फ विराराम भूराराम भिल्ल ( वय 27 सध्या रा.पाडळी ,वापी ,मूळ गाव फालना जि.पाली राजस्थान ) हरीशकुमार बहिराजी परिहार ( वय 37 सध्या रा. संगमनेर ,मूळ गाव पराकीया ,जि.पाली राजस्थान ) झाकीर नबाब खान उर्फ पठाण ( वय 40 , रा श्रमिक नगर संगमनेर जि.अहमदनगर ) यांना संशयावरून ताब्यात घेतले . त्यांची झडती घेतली असता एक गावठी कट्टा ,तीन जिवंत काडतूस ,एक एयर पिस्तुल ,दोन कोयते ,स्क्रू ड्रायव्हर ,वायर कटर ,मिरची पूड , मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 52 हजार 335 रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला .
गेल्या दोन दिवसापासून त्यांनी चाकण मधील भरवस्तीतील सराफ व्यावसायिकाची पाळत ठेऊन माहिती घेतली होती. या गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकातील पोलीस निरक्षक दयानंद गावडे, अंकुश माने, दत्तात्रय गिरमकर, विजय पाटील, लियाकत मुजावर, गुरुनाथ गायकवाड, सुनील जावळे, सुभाष राऊत , पोपट गायकवाड, प्रमोद नवले आदींनी ही कारवाई केली. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस करीत आहेत . गेल्या अनेक दिवसापासून पोलीस या टोळीच्या मागावर होते. पुण्यासह नगर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणच्या गुन्ह्यात या टोळीचा सहभाग आहे का याबाबत पोलीस तपास करीत आहेत .या टोळीला पकडल्याने अनेक गुन्हे उघडकीस येण्यची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी सांगितले.