पिंपरी-चिंचवड : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तीन जणांना पिंपरी पोलिसांनी अटक केली. मात्र, त्यांचे इतर पाच साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले. ही कारवाई मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोहननगर, चिंचवड येथील परशुराम चौकात करण्यात आली. अतुल नागेश खंडागळे (वय 21), रोहित प्रकाश हिरे (वय 19), सुरज संजय खवळे (वय 21) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर यांचे साथीदार गोरख राखपसरे, सोन्या उर्फ ओंकार मोरे, स्वप्नील बाळासाहेब राक्षे (सर्व रा. चिखली), विकी कांबळे व जंब्या (दोघे रा. निगडी) हे पसार झाले आहेत.
सापळा रचून पकडले
सशस्त्र दरोड्याच्या तयारीतील टोळके मोहननगर परिसरात असल्याची माहिती मंगळवारी रात्री पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिसरात सापळा रचला असता, परशुराम चौकाजवळील झाडाझुडपात संशयास्पद टोळके दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला. दरम्यान पोलिसांनी पाठलाग करून तिघांना पकडले. मात्र, त्यांचे पाच साथीदार पसार झाले.
हॉटेलवर दरोड्याचा होता प्लॅन
आरोपींकडून लोखंडी तलवार, मिरचीपूड, नायलॉन दोरी, लाकडी दांडके, दुचाकी व रोख पाचशे रुपये असा 1 लाख 1 हजार 225 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अधिक चौकशी केली असता ते पिंपरीतील गायत्री हॉटेलवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले. पोलीस उपनिरीक्षक हरिदास बोचरे पुढील तपास करत आहेत.