दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव उधळला

0

एक सराईताला अटक; तीन साथीदार फरार

पिंपरी : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईताला पिंपरी पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत असलेले अन्य तीन साथीदार मात्र फरार झाले. ही कारवाई मोहननगर येथे बुधवारी (दि. 9) पहाटे साडेचारच्या सुमारास केली. सुरजित सिंग राजपालसिंग टाक ( वय 27, रा. बिजलीनगर, हडपसर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे इतर तीन साथीदार लखनसिंग दुधानी (वय 30 रा. रामटेकडी, हडपसर), नटराज गाडगे (रा. रामटेकडी, हडपसर), संतोष साळवे फरार झाले आहेत.

बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मोहननगरमधील लोखंडे हॉस्पिटलच्या मागील इमारतीमध्ये चार संशयित इसम घुसल्याची महिती पोलिस कंट्रोलने कळविली. त्यांनी तोंडाला रुमाल बांधले असून अंगात काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. या माहितीच्या आधारे पोलिस शिपाई सोनवणे, भोपे, पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोहननगर मार्शलचे कर्मचारी झनकर व पोटकुले यांच्यासोबत इमारतीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी इमारतीमधील संशयित चार इसमांचा अतिशय शिताफीने पाठलाग केला. चौघांपैकी एकजण ताब्यात आला असून अन्य तिघे जण पळून गेले.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची तपासणी केली असता, त्याच्याकडून सुमारे 300 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू, एक ग्रॅम वजनाचा सोन्याचा सिक्का, एक, दोन, पाच रुपयांची नाणी आणि दरोडा टाकण्यासाठी लागणारी प्राणघातक हत्यारे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपीविषयी अधिक चौकशी केली असता, तो पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात मालाविरुद्धचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये त्याला अटक देखील झाल्याचे त्याने सांगितले. तसेच काही दिवसांपूर्वी चिखली येथे रात्री घरफोडी करुन अंदाजे दीड तोळे सोने चोरले आहे. चोरी करण्यासाठी सॅन्ट्रो कार (एम एच 04 / बी क्यू 9173) वापरली होती. ती कार देखील चोरीची आहे. त्याच कारसोबत अन्य तिघांनी पोबारा केला आहे. ही कारवाई पिंपरी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक रत्ना सावंत यांच्या पथकाने केली.