दरोड्याच्या प्रयत्नातील मुंबईसह डोंबिवलीच्या कुविख्यात सात दरोडेखोरांना अटक

0

दोन पिस्तुल व काडतुस व कारसह दहा लाखांचा मुद्देमाल मोहाडी पोलिसांकडून जप्त

धुळे- शस्त्रांच्या धाकावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या मुंबईसह डोंबिवलीतील कुविख्यात सात दरोडेखोरांच्या मोहाडी पोलिसांनी बुधवारी पहाटे मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी धुळेमार्गे जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला मात्र आरोपींनी चाहूल लागल्याने त्यांनी वाहनाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांच्या शिताफीने मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, तलवार, चाकू, सहा मोबाईल फोन, मिरची पूड व दोरी या एकूण 10 लाख 9 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींपैकी एकाविरुद्ध मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी ठिकाणी 20 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी पाहताच दरोडेखोरांनी काढला पळ
मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना काही दरोडेखोर मध्यप्रदेशातील उज्जैनहून कारद्वारे मुंबईकडे निघाल्याची व महामार्गालगत टोल नाक्याच्या आसपास ते हॉटेलवर जेवणासाठी थांबणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांना माहिती दिली व नंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक पायमोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मराठे, ब्राम्हणे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे, जाधव, भामरे, वाघ, दाभाडे, महाले हे वाहनांची तपासणी सुरू केली. अवधान एमआयडीसी परीसरातील बालाजी प्लाय कंपनीजवळ पांढर्‍या रंगाची कार (एम.एच.03 ए.एम.8562) झाडाच्या आडोशाला उभी असलेली दिसून आली. पोलिसांचे पथक या कारकडे जात असताना दरोडेखोरांनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र पथकाने कारचा पाठलाग करून टोलनाक्याजवळ वाहन अडवले. वाहनाच्या तपासणीत 60 हजार रुपये किमतीचे दोन देशी बनावटीचे पिस्तूल, 200 रुपये किंमतीची दोन जिवंत काडतुसे, 500 रुपये किमतीची तलवार, 100 रुपये किमतीचा चाकू, 49 हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल फोन, मिरची पूड व दोरी असा एकूण 10 लाख 9 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळला.

दरोड्याच्या उद्देशाने आल्याची कबुली
कारमधील सात दरोडेखोरांपैकी अमित पाटील याच्याविरुद्ध खंडणी, दरोड्यासह आर्म अ‍ॅक्टसह 20 पेक्षा जास्त विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. आरोपींनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याविरूद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अन्य आरोपींबाबतही संबंधित पोलिस ठाण्यांकडून त्यांचे क्राईम रेकॉर्ड मागवण्यात आले आहे तर गुरुवारी आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी सांगितले.

या सात दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी अमित नामदेव पाटील (33, रा.संगीता निवास, शिळफाटा रोड, काराई गाव, बोरीवली पूर्व, मुंबई), अभिषेक अरुण ढोबळे (29, रा.नांदीवली गाव, डोंबिवली पूर्व, जि.ठाणे), पंकज सुरेश साळुंखे (26, रा.दत्तकृपा, रूम नं.8, गणेश नगर, डोंबिवली पश्चिम, जि.ठाणे), जितेश पुकराज लालवाणी (30), रा.टिळक नगर, तिसरा माळा, रूम नं.301, रा.डोंबिवली पूर्व), विकास कांतीलाल लोंढे (42, रा.कुंभार कानपाडा, रागाई सावली, रूम नं. 103, डोंबिवली पश्चिम), मंगेश कृष्णा भोईर (39, रा.कृष्णा भोईर चाळ, रूम नं.1, गुप्ते रोड, जैन कॉलनी, डोंबिवली पश्चिम) आणि रवींद्र सुरेश चव्हाण (45, रा.चक्रधर कॉलनी, मोहाडी उपनगर, धुळे) यांना अटक करण्यात आली.