दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षकामुळे वाढली पुरस्काराची उंची 

डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांचे प्रतिपादन : डॉ. जगदीश पाटील सरांचा भव्य नागरी सत्कार

भुसावळ – ज्ञान हाच सदाचार आणि सदाचार हेच ज्ञान असे मानून दीपस्तंभासारखे काम करणाऱ्या डॉ. जगदीश पाटील सर यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाला आहे. शिक्षकांच्या जीवनात पुरस्काराचे खूप महत्त्व असते. डॉ. जगदीश पाटील सरांसारख्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षकाला राज्य पुरस्कार मिळाल्याने पुरस्काराची उंची वाढली आहे, असे प्रतिपादन भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा डीवायएसपी कृष्णांत पिंगळे यांनी केले.

 

भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात डॉ. जगदीश पाटील सर गुणगौरव समितीतर्फे आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात श्री. पिंगळे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन तर प्रमुख पाहुणे म्हणून शारंगधर महाराज, सुरेश महाराज, लक्ष्मण महाराज, महेंद्रसिंग ठाकूर, डॉ. छाया फालक, राजेंद्र चौधरी, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. राजेंद्र भदाणे, डॉ. जतीन मेढे, प्रा. निलेश गोरे, डॉ. दिलीप ललवाणी, मुन्ना ठाकूर, राजेंद्र आवटे, ॲड. तुषार पाटील, ॲड. प्रकाश मोझे, चंद्रकांत चौधरी, रवी ढगे, शैलेंद्र ठाकरे, प्रा. दिनेश राठी, डॉ. शुभांगी राठी, प्रेम परदेशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रारंभी सरस्वती मातेच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविकात डी. के. पाटील यांनी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. त्यानंतर डॉ. दिलीप ललवाणी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. जगदीश पाटील यांना भलामोठा हार, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन कुटुंबासह भव्य नागरी सत्कार करण्यात आला.

 

डीवायएसपी कृष्णांत पिंगळे म्हणाले की, चांगल्या लोकांचा सन्मान व्हायला हवा. शिक्षकांच्या सन्मानामुळे माझ्यातील शिक्षकालाही आनंद होतो. भविष्यात करायचे काम कागदावर नोट लिहून नेहमी खिशात ठेवायला हवी, असेही ते म्हणाले. त्यानंतर दिनकर जावळे, डॉ. नरेंद्र महाले, नितीन भालेराव, शैलेंद्र ठाकरे, राजेंद्र चौधरी, महेंद्रसिंग ठाकूर, चंद्रकांत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी मोबाईलवरून दिलेल्या आशीर्वादरूपी शुभेच्छा शैलेंद्र महाजन यांनी ऐकवल्या. सत्कारार्थी मनोगतात डॉ. जगदीश पाटील म्हणाले की, आपण सर्वांनी मिळून केलेला गुणगौरव हा माझ्या आयुष्यातील सोनेरी पान ठरला असून ते पान मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे.

 

अध्यक्षीय मनोगतात प्रा.डॉ.सौ. आशालता महाजन म्हणाल्या की, संत रामदासांचा जसा कल्याण शिष्य होता, तसा माझा शिष्य जगदीश आहे. त्याच्या सन्मानाने भुसावळच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. तरीही न डगमगता आपले कार्य जोमाने सुरू ठेवून सतत प्रयत्न व अभ्यास केल्यामुळे त्याला हा सन्मान मिळाला आहे. कर्तव्याचे महामेरू डॉ. जगदीश पाटील हे अध्यात्मिक शक्तीमुळे दुःख पचवून यश मिळवत आहेत, याचा मनस्वी आनंद होत असल्याचेही डॉ. महाजन म्हणाल्या.

 

सूत्रसंचालन प्रमोद आठवले यांनी तर आभार शैलेंद्र वासकर यांनी मानले. त्यानंतर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, अध्यात्मिक, वैद्यकीय, कृषी, कला, क्रीडा, ज्येष्ठ नागरिक, नातेवाईक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन डॉ. जगदीश पाटील सर यांचा सन्मान केला.

 

फोटो ओळी – डॉ. जगदीश पाटील सर यांचा भव्य नागरी सत्कार करताना डीवायएसपी कृष्णांत पिंगळे, डॉ. आशालता महाजन, हभप शारंगधर महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर.