दर्यापूरचे सरपंच अविश्‍वास ठरावानंतर अखेर पायउतार

0

प्रस्तावाच्या बाजूने केले 17 पैकी 13 सदस्यांनी मतदान

भुसावळ- तालुक्यातील दर्यापूरचे सरपंच हे सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी पद्धतीने काम करीत असल्याच्या कारणावरून 17 पैकी 14 सदस्यांनी सोमवारी तहसिलदारांकडे अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार शुक्रवारी दर्यापूर ग्रामपंचायतच्या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये 13 सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने सरपंच सुनील कोळी यांना पायउतार व्हावे लागले. सुनील कोळी हे तीन वर्षापासून दर्यापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर विराजमान होते मात्र या कालावधीत त्यांनी गावाच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करीत उपसरपंच व सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज केल्याचा ठपका ठेवत उपसरपंचासह 14 सदस्यांनी 9 रोजी प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्याकडे अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार शुक्रवारी दर्यापूर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

13 सदस्यांच्या मतदानानंतर सरपंच पायउतार
सरपंच सुनील कोळी यांच्यावरील अविश्‍वास ठरावाला वंदना चौधरी यांनी सूचक तर कुसूम गायकवाड यांनी अनुमोदन दिले तर 17 पैकी 13 सदस्यांनी अविश्‍वासाने ठरावाच्या बाजूने कौल दिल्याने सरपंच सुनील कोळी यांना सरपंचपदावरून पायउतार व्हावे लागले. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर आता कुणाची वर्णी लागते ? याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

यांनी दिला अविश्‍वास ठरावाच्या बाजूने कौल
उपसरपंच आशा मेघे, सदस्या कुसूम गायकवाड, अपेक्षा शिंदे, छाया तायडे, अनिता लोखंडे, लक्ष्मी सपकाळे, वंदना चौधरी,अनिता पाटील, सदस्य बोधीसत्व अहिरे, नितीन सोनवणे, राजेश शिंदे, रामदास खोंडे, गणेश गावंडे, अजय चौधरी यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने कौल दिला. यावेळी सरपंच सुनील कोळींसह चार सदस्यांनी विशेष सभेला गैरहजेरी नोंदवली.

यांनी हाताळले विशेष सभेचे कामकाज
अविश्‍वास ठरावाच्या विशेष सभेचे प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांच्या अध्यक्षतेखाली भगवान शिरसाठ, मंडळाधिकारी आर.के.पवार, तलाठी दिलीप पवार, ग्रामविकास अधिकारी सुरवाडे यांनी कामकाज हाताळले.