दलवाडे पोलीस पाटील धुळे एसीबीच्या जाळ्यात

विमा योजनेची रक्कम मंजुरीसाठी मागितली दोन हजार 540 रुपयांची लाच

धुळे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम मिळवून देण्यासाठी दोन हजार 540 रुपयांची लाच मागणार्‍या शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्र.न.गावातील पोलीस पाटील अनंत भाईदास देशमुख (40, रा.दलवाडे प्र.न., ता.शिंदखेडा) यांना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली.

पोलीस पाटलाला भोवली लाच
36 वर्षीय तक्रारदार यांच्या वडीलांचे नावे एक हेक्टर 27 आर जमीन असून या जमिनीवरील पिकावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम मिळवून देण्यासाठी 20 रुपये गुंठ्याप्रमाणे आरोपी अनंत देशमुख यांनी दोन हजार 540 रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयीताने विरदेल गावाजवळ एस.आर.पेट्रोल पंपाजवळ बोलावल्यानंतर बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तक्रारदाराकडून पैसे स्वीकारताच देशमुख यांना पथकाने अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, जयंत साळवे, शरद काटके, कैलास जोहरे, पुरुषोत्तम सोनवणे, कृष्णकांत वाडीले, राजन कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, संदीप कदम, महेश मोरे, चालक सुधीर मोरे, बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.