नवी दिल्ली । भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकारने एक धक्कादायक फतवा जारी केला आहे. जगाला शांतीचा संदेश देणार्या तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान सांगणार्या बौद्ध धर्मगुरू दलाई लामांविरोधात एक फतवा जारी केला आहे. दलाई लामा यांच्या कार्यक्रमांना कोणत्याही नेत्यांनी किंवा अधिकार्यांनी हजेरी लावू नये, असे आदेश देणारे एक पत्रकच केंद्र सरकारतर्फे जारी करण्यात आले आहे. चीनसोबत भारताचे संबंध तणावाचे आहेत त्यामुळे दलाई लामा यांच्या कार्यक्रमात जाण्याची आवश्यकता नाही, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी कॅबिनेट सचिव सिन्हा यांना हे पत्रक पाठवले होते.
चीनला आवडत नाही म्हणून केंद्र सरकारने काढले पत्रक
केंद्र सरकारमधील नेते, अधिकारी आणि कर्मचारी यांनी दलाई लामा यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावू नये. सध्याच्या घडीला भारत आणि चीन यांच्यातील परस्पर संबंधांवर चर्चा होते आहे. अशात दलाई लामा यांच्या कार्यक्रमांना जर भारताचे नेते आणि सरकारी अधिकारी व कर्मचारी हजेरी लावत असतील तर परिणामांना सामोरे जावे लागेल. म्हणून कार्यक्रमांना हजेरी लावू नये असे सरकारने म्हटले आहे. त्यांच्या एका कार्यक्रमासाठी तिबेटमधील अनुयायी गेले होते तेव्हा चीनने या अनुयायांना परतण्याचे आदेश दिले होते. तिबेटी लोक आपल्या धार्मिक स्थळांना भेट देण्याऐवजी दलाई लामांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत हे चीनला पटले नव्हते.