खालापुर : महाराष्ट्रातील शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करत आहेत. त्यांचे थकीत कर्ज माफ करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरकार विरोधात आंदोलने करून त्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली व त्याला काहीसे यश आले आहे. त्याचप्रमाणे दलित, ओबीसी व आदिवासी मागासवर्गीय बेरोजगार तरूणांनी आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घेतले. परंतु आर्थिक संकटात सापडल्यामुळे हे तरूण कर्जाची परतफेड करू न शकल्याने राज्य सरकारने त्यांचे थकीत कर्ज माफ करावे या मागणासाठी आरपीआय (आठवले गट)तर्फे महाराष्ट्राभर मंगळवारी जिल्हाधिकारी व तहसिल कार्यलायांत आंदोलन करून निवेदन देण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले असता रायगड युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचे नेतृत्वाखाली रायगड जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी आरपीआयजिल्हा सरचिटणीस सुरेश वाघमारे अलिबाग तालुकाध्यक्ष सुनिल सप्रे, सुनिल मोरे, शंकर माने, संजय जाधव, किशोर जैन जागडे, सलिम डिगी यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.