दलित चळवळीला दिशा देण्यासाठी विचारवंतांनी एकत्र यावे : आ. जयदेव गायकवाड

0

पुणे । एकजात आणि दहा गट यात अडकलेल्या दलित चळवळीला दिशा देण्यासाठी, ती अधिक घनगंभीर करण्यासाठी विचारवंतांनी एकत्र यावे, असे आवाहन आ. जयदेव गायकवाड यांनी अ.भा.सम्यक साहित्य संमेलनात दलित चळवळीची सद्यस्थिती आणि लेखकांची भूमिका या परिसंवादात बोलताना केले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विलास वाघ होते. या परिसंवादात आ. जयदेव गायकवाड, नीळकंठ शेरे, भारत पाटणकर आणि अपर्णा लांजेवार-बोस यांनी भाग घेतला.

आपण पाणी फेरलं आहे
अध्यक्षस्थानावरून बोलताना विलास वाघ म्हणाले, नेहमी एक प्रश्‍न विचारला जातो की बाबासाहेबांची चळवळ सुरू आहे का. आरपीआयचं काम कसं सुरू आहे. त्यावेळी सांगावं लागतं बाबासाहेबांनी जे काही केलं त्याच्यावर आपण पाणी फेरलं आहे. बाबासाहेबांच्या अनुयायांनीच त्यांची जात अजून टाकली नाही. व्यक्तीगत सुधारण्यावर आम्ही जोर दिला आणि समाजाचं काही देण घेण नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे जाती अंताच्या लढाईत, दलित राजकारणात अपयशी ठरलो.

नवा समाज निर्माण करण्याची उर्मी
भारत पाटणकर म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरणानंतर कोणता नेता पुढे आला कोण मागे गेला अशीच चर्चा सुरू आहे. परंतू, या घटनेच्या ब्राम्हणवादी मानसिकतेकडे पुर्ण दुर्लक्ष केले जात आहे. आमच्या काळात नविन समाज निर्माण करण्याची उर्मी दलित पँथरमध्ये होती. अशी चळवळ आता राहिली नाही. अशा काळात नविन समाजाच्या निर्मितीसाठी ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही नाहीशी करण्यासाठी अण्णाभाऊंच्या गाण्याप्रमाणे लेखणी मजबूत करण्याची गरज आहे.

बहुसंख्याकांना जोडण्याचे काम करा
यावेळी आ. गायकवाड म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांविषयी भावनात्मक अभिनिवेश असतो पण बाबासाहेब आपल्याला खरेच कळले का अशी मला नेहमी शंका येते. बाबासाहेबांच्या विचारांचा परिघ फार मोठा होता. यात देशप्रेम ओतप्रोत भरलेले होते. पण त्यांच्या विचारांचा वारसा आपल्याला कळला की नाही हा प्रश्‍न उपस्थित होतो. एकजातीय आणि संकुचित असे स्वरूप चळवळीला आले आहे, ते पाहून कधी कधी नैराश्य येते. या चळवळीने सर्व बहुसंख्याकांना जोडण्याचे काम करावे. याकरिता विचारवंत आणि लेखकांनी एकत्र यावे आणि दिशा द्यावी. अपर्णा लांजेकर म्हणाल्या, दलित चळवळीची नवी दिशा, धोरण ठरवावे लागणार आहे. सत्तरच्या दशकात दलित तरूणांच्या रागाला वाट करून देणारी दलित पँथर उदयाला आली. त्यावेळी नामदेव ढसाळ, राजा ढालेंसारखे कार्यकर्ते लेखन सुद्धा करत होते. मात्र, आताचा कोणता लेखक चळवळ करताना दिसतो का? आपण फक्त चळवळीच्या नावावर केवळ प्रतिक्रियावादी झालो आहोत का? आजपर्यंत संपुर्ण समाज बाबासाहेबांची पुण्याईवर जगत आहे. आताचा लेखक हा कार्यकर्ता म्हणून राहिला नाही.