दलित तरुणांविरुद्धचे कोम्बिंग ऑपरेशन थांबवा!

0

मुंबई – महाराष्ट्र बंदनंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. घराघरात घुसून पोलीस धरपकड करीत असतानाच भारिप बहूजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दलित तरुणांविरुद्धचे हे कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे अशी मागणी केली आहे. बंदमध्ये केवळ दलितच नव्हे तर दलितेतर समाजही सहभागी झाला होता. बंदमुळे या समाजाचा राग आम्ही एका जागी व्यक्त केला, मात्र तो अधिक काळ शांत ठेवू शकत नाही. कारवाईबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकर झाली नाही तर यानंतरची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांची आहे, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

तरुण पोलीसांसमोर हजर होतील
प्रकाश आंबेडकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, आम्ही तीन मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. त्यामध्ये दलित तरुणांविरुद्धचे कोम्बिंग ऑपरेशन तत्काळ थांबवावे ही आमची प्रमुख मागणी होती. ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. या तरुणांची यादी समाजातील प्रतिनिधींकडे दिली जावी. त्यानंतर हे तरुण पोलीसांसमोर हजर होतील. त्यानंतर जी कायदेशीर कारवाई केली जाईल, त्याला आम्ही सामोरे जाऊ.

-न्यायाधीशाच्या समितीला कारवाईचे अधिकार द्या!
या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यासाठी न्यायाधीशांच्या पॅनेलमधील न्यायाधीश निवडण्यात येणार आहेत. मात्र या समितीने केवळ शिफारस करू नये तर त्यांना सीआरपीसी कायद्यानुसार कारवाईचे अधिकार द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असून ती त्यांनी मान्य केल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आमच्य मागण्या मान्य करून आश्वासने दिली असली तरी त्यांची पूर्तता होते की नाही हे पाहायचे आहे. संभाजी भीडे आणि मिलिंद एकबोटेंना अटक होते की नाही, ही बाब आमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ज्यांच्यावर हल्ला झाला त्यामध्ये दलितांप्रमाणेच हिंदू समाजातील लोकही होते. आमच्यावर हल्ला का झाला हा प्रश्न ते विचारत आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून लोकांना विश्वास द्यायला हवा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.