दलित नेते रामनाथ कोविंद एनडीएचे उमेदवार

0

नवी दिल्ली : बिहारचे राज्यपाल व भारतीय जनता पक्षाच्या दलित मोर्चाचे माजी अध्यक्ष, दलित नेते रामनाथ कोविंद यांना सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तर्फे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे वरिष्ठ नेते आणि एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून ही उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची माहिती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी राजधानी नवी दिल्लीत दिली. ज्येष्ठ विधिज्ज्ञ असलेेले कोविंद हे दोनवेळा राज्यसभेचे खासदार, संसदीय समितीचे सदस्य, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तेपद भूषवलेले आहे. सद्या ते बिहारचे राज्यपाल असून, एनडीएतील सर्व घटकपक्षांनी त्यांच्या नावावर सहमती दर्शविली असल्याची माहितीही शहा यांनी दिली. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.

भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
मंगळवारपर्यंत भाजप व एनडीएने राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर केला नाही तर विरोधी पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल, अशी धमकी डाव्या पक्षाच्यावतीने देण्यात आली होती. त्यानंतर भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्यात. राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीतून सुषमा स्वराज यांनी माघार घेतल्यानंतर रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे आले. त्यावर सोमवारी झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)मधील घटक पक्ष, डाव्या पक्षांसह इतर विरोधी पक्ष आता कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देतात, की स्वतंत्र उमेदवार उभा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी काँग्रेस व डाव्या पक्षांच्या नेत्यांशी भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली होती. या चर्चेनंतर सरकार केवळ विरोधी पक्षाचे सहकार्य मागत आहे. उमेदवाराच्या नावावर सर्वसहमती करण्यासाठी इच्छुक नाही, अशी टीका विरोधकांनी केली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र विरोधकांच्या या टीकेचे खंडन केले होते.

शिवसेनेची भूमिका काय असेल?
एनडीएकडून राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेतृत्व पुन्हा एकदा विरोधी पक्षांशी संपर्क साधणार असल्याची माहिती भाजपसूत्राने दिली. शिवसेनेने रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत किंवा कृषिशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या नावाचा आग्रह धरला होता. शिवसेनेबाबतचा पूर्वानुभव पाहाता, शिवसेनेने दोनवेळा युपीएच्या उमेदवारास पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने भाजपच्याविरोधात जाऊन मतदान केलेले आहे. त्यामुळे आता कोविंद यांना शिवसेना पाठिंबा देते किंवा नाही याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. काल अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीतही शिवसेनेने भाजपला ठोस शब्द दिला नव्हता.

सर्वसहमतीसाठी पुन्हा प्रयत्न!
दरम्यान, भाजपने आपल्या खासदार आणि आमदारांना दिल्लीत बोलावले असून, राष्ट्रपती निवडणुकीकरिता दाखल करावयाच्या नामांकन पत्रांवर सह्या घेतल्या जाणार आहेत. एकूण चार नामांकन दाखल करावे लागतात, त्यात प्रत्येक नामांकनावर 50 सूचक व 50 अनुमोदकांच्या सह्या असतात. सह्यांसाठी 19 व 20 जूनरोजी खासदार व आमदार दिल्लीत दाखल होत असून, 23 जूनरोजी कोविंद आपले नामांकन दाखल करतील, अशी शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः हजर राहतील, असेही भाजपसूत्र म्हणाले. मतांचा आकडा लक्षात घेता, एनडीएकडे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ आहे. तथापि, या पदाचा उमेदवार सर्वसहमतीने निवडला जावा, अशी एनडीएची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह व केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे प्रयत्न करत आहेत.