दलित संघटनांची पोलिसांसोबत बैठक

0

पिंपरी : गेल्या 1 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराला 1 वर्ष पूर्ण होते आहे. त्यामुळे आता या 1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करायला जाणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मागील वर्षीचा हिंसाचार झाल्याने पोलिसांनी भोसरी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यामध्ये दलित संघटनांच्या पदाधिकार्‍यांची एकत्रित बैठक पार पडली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र कुंटे यांनी या पदाधिकार्‍यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम आणि पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी संयुक्त पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी विजयस्तंभाच्या परिसराची पाहणी करत, विविध उपाययोजना करण्याच्या संबंधितांना सूचना केल्या.

पोलिसांनी केले मार्गदर्शन

पिंपरी-चिंचवड शहरामध्येही दलित वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे काही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून दलित संघटनेच्या पदाधिकार्‍यांना एकत्र बोलविले. त्यामुळे ही दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क रहावे, असे सांगितले. या बैठकीला भारिप बहुजन महासंघाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, राहूल इनकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, गिरीष वाघमारे, सुनील कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड शहरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी किती कार्यकर्ते जाऊ शकतील, याचा अंदाज घेण्यात आला.