दशक्रिया विधीत मरणोत्तर नेत्रदान शिबिर घेवून पित्याला श्रध्दांजली

0

सामाजिक संदेशाचे आणि कृतीचे सर्व थरातून कौतुक

राजगुरुनगर  : वडिलांच्या मृत्यूवियोगाचे दुःख पचवत शिवाजी आतकरी, संदीप आतकरी यांनी दशक्रिया विधीवेळी नेत्रदानाचे शिबिर घेऊन अनोख्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली. ज्यातून सामाजिक भान जपले जाईल, समाजाला उपयोग होईल आणि स्वर्गवासी झालेल्या व्यक्तीला खर्‍या अर्थाने श्रद्धांजली ठरेल यातून नेत्रदानाचा संकल्प करण्यात आला त्यासाठी शिबिर घेण्यात आले. तसेच दशक्रिया घाटावर नेत्रदानाचे महत्व पटवून सांगण्यात आले. दशक्रियेत अशा अनोख्या पद्धतीने मरणोत्तर नेत्रदानाच्या शिबिरातून श्रद्धांजली वाहण्यात आली. या सामाजिक संदेशाचे आणि कृतीचे सर्व थरातून कौतुक झाले.

विज्ञान आणि अध्यात्मावर प्रवचन
एसटी महामंडळातील एक आदर्श कर्मचारी रामभाऊ कोंडाजी(सावकार) आतकरी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्‍चात श्रद्धांजली खर्‍या अर्थाने वाहायची असेल तर शाब्दिक पेक्षा कृतीतून श्रद्धांजली वाहण्याचा विचार कुटुंबियांमध्ये पुढे आला. त्यातून मरणोत्तर नेत्रदान शिबिर घ्यायचे ठरले. घरातील दुःखद घटनेचे सावट बाजूला करून स्वर्गीय रामभाऊ आतकरी यांच्या दशक्रियेच्या दिवशी नेत्रपेढीशी चर्चा करून जाणकार लोक पाचारण करण्यात आले. गावात व दशक्रिया घाटावर नेत्रदानाचे महत्व सांगणारे फ्लेक्स, पोस्टर्स, स्टिकर्स आणि पत्रके लावण्यात आली. एरव्ही धार्मिक विधी व आध्यात्मावर होणारे प्रवचन त्या दिवशी हभप भरत महाराज थोरात यांनी आध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालून केले. ओव्याऐवजी नेत्रदानाचे महत्व त्यांनी पटवून सांगितले.

आमदारांनी केला नेत्रदानाचा संकल्प
या उपक्रमाचे कौतुक मनसेचे आमदार शरद सोनवणे यांनीही केले तसेच स्वतः मरणोत्तर नेत्रदानाचा अर्ज भरला. पुणे जिल्ह्यातील अशी संकल्पना पहिल्यांदाच पहात असल्याचा उल्लेख करून नेत्रदानाची चळवळ उभी राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

उपस्थितांनी केले कौतुक
पित्याच्या दुःखवियोगातही सामाजिक भान जपून सामाजिक संदेश देणार्‍या पत्रकार शिवाजी आतकरी, संदीप आतकरी या बंधूंचे उपस्थितांनी कौतुक तर केलेच शिवाय मरणोत्तर नेत्रदान करण्यासाठी आपले अर्ज भरले. पिंपरी चिंचवडमधील बिर्ला हॉस्पिटल नेत्रपेढी तसेच योगेश सोनवणे, मदन वाबळे, वृषाली आतकरी, दिनेश कुर्‍हाड़े, सुरेश कोरडे, कैलास शिंदे, सीमा आतकरी, विनीत डुंबरे, सारिका सोनवणे यांनी ही संकल्पना राबवली. या शिबिरात बावन्न जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले. अशा आगळ्या वेगळ्या श्रध्दांजलीचे कौतुक आणि चर्चा मात्र सर्व थरातून होत आहे.