दशक्रीया घाटाजवळ सोयीसुविधा पुरवा

0

शिरूर । शहरातील दशक्रीया विधी घाटाच्या दुरवस्थेबाबत दै. जनशक्तिमधून वृत्त प्रसारीत होतात नगरसेवकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. दशक्रीया घाटाजवळ सोयीसुविधा पुरवणे, अमरधाम बांधणे, हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण करणे व शिरूर नगरपरिषदेशेजारील स्वच्छतागृह अद्ययावत करण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते नगरसेवक मंगेश खांडरे यांनी दिली.

शहरातील कुंभार आळीजवळ घोडनदी किनार्‍यावर असलेल्या दशक्रीया विधी घाटावर मोठ्या प्रमाणात नागरीक येत असतात. परंतु सोयी सुविधांअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते. घाटाच्या परीसरात शौचालय, पाण्याची सुविधा तसेच कपडे बदलण्यासाठी व मुंडन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. शहरात असलेले अमरधाम हे मध्यवर्ती ठिकाणापासून एक ते दिड किलोमीटर असल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागतो. दशक्रीया विधी घाट शहराच्या मध्यवर्ती असून घाटाच्या परीसरातच अमरधाम उभारून नागरीकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

हुतात्मा स्मारकाची दुरवस्था
शहरातील हुतात्मा स्मारकाची उभारणी ही 1975 साली झालेली आहे. त्याची आता दयनीय अवस्था झाली असून त्याचे नूतनीकरण करण्यात यावे. तसेच नगरपरिषदेजवळ असलेल्या स्वच्छतागृहाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून परिसरातील नागरीकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याने सदर स्वच्छतागृह अद्ययावत करावे, आदी नागरी सुविधा करण्याची मागणी खांडरे यांनी नगरपरिषदेकडे लेखी पत्र देऊन केली आहे.