दसरा हा एकच सण असला तरी या सणाच्या दिवशी विविध प्रथा पाळल्या जातात. या दिवशी सोनं लुटतात, शाळेत पाटीपूजन केलं जातं, शस्त्रांची पूजा केली जाते, रावणाच्या प्रतिकृतीचं दहन केलं जातं. त्यामुळे वैविध्यपूर्ण सण अतिशय आनंदाने साजरा केला जातो. ही प्रत्येक प्रथा आपल्याला काही शिकवण देत असते. कोणताही सण साजरा करताना त्या सणाद्वारे दिला जाणारा संदेशही आपण आचरणात आणला तर सण साजरा केल्याचा आनंद मिळतोच आणि चांगल्या सवयीही आपल्या अंगी बाणतात…मात्र, अलिकडच्या काळात या दिवशी राजकीय मेळाव्यांचे पिक आले आहे.
वर्षभरात आपण वेगवेगळे सण साजरे करतो. प्रत्येक सणाचे महत्त्व असतेच. पण या सगळ्या सणांपैकी ‘साडेतीन शुभ मुहूर्त’ मानले जातात. दसरा, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया हे तीन मुहूर्त आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘बलिप्रतिपदा’ हा अर्धा मुहूर्त होय. हिंदू संस्कृतीत या सणांचे महत्त्व काही औरच आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी हे दिवस उत्तम मानले जातात. अश्विन शुद्ध दशमी हा दिवस ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रामाने रावणाचा वध केला. अनेक ठिकाणी रावणाची मोठी प्रतिकृती उभी केली जाते आणि नंतर तिचे दहन केले जाते. काही लोक रावणाची दहा तोंडं म्हणजे दहा दुर्गुणांचे प्रतिक मानतात. याच दिवशी मित्र -मैत्रिणींबरोबर, नातेवाईक, वडिलधार्यांना आपट्याची पाने म्हणजेच ङ्गसोनेङ्घ देतो. आपल्याकडे असलेलं ज्ञान, लक्ष्मी इतरांसोबत वाटल्याने एकमेकांमधला सलोखा वाढतो, आनंद वाढतो, हाच संदेश ही ‘सोनं लुटण्याची’ प्रथा देते. मात्र, गेल्या काही वर्षात दसरा मेळाव्याचे पीक आले आहे. तसेच मेळाव्याची आमचीच परंपरा आणि तीही मोठी असे दावेही करण्यात चढाओढच सुरू आहे. यातूनच हे मेळावे म्हणजे राजकीय व्यासपीठ झाले आहे. वास्तविक दसर्या दिवशी कार्यक्रम म्हणजे विचारांची देवाणघेवाण असायला हवे, विचाररुपी सोने लुटायला हवे. मात्र, या दिवशी होते काय? राजकीय विरोधकांवर आरोपांची राळ उडविली जाते! जनता गेली खड्ड्यात! आपले अस्तित्व महत्वाचे. आरोपात दम का नसेना, पण आवाज इतका मोठा की या तमाम नागरिकांचे कैवारी आपणच आहोत. यातूनच माध्यमांतून नको तितकी प्रसिद्धी, 24 तास नको त्या बातम्यांचा रतिब घालणार्या दूरचित्रवाणी वाहिन्या त्याचे थेट प्रक्षेपण करतात. बरं, हे मेळावे जवळपास एकाचवेळी सुरू होत असल्याने 24 इंची पडद्यावर लहान लहान चौकटीत हे मेळावे दाखवतात. त्यातही काही आयोजक चलाखी करून दुसर्यांचे मेळावे सुरू झाल्यानंतर आपला मेळावा सुरू करतात. एकूणच काय दसर्याचा वापर राजकीय व्यासपीठ म्हणून करतात. शक्तिप्रदर्शन दाखवतात. ते अतिशय चुकीचे आहे, याचमुळे आम्हाला येथे दखल घ्यावी लागत आहे. यंदा म्हणजे गुरूवारच्या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही प्रखर हिंदुत्वाचा अंगीकार करणार असून हिंदुत्वाचा एल्गार करीत राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निकराचा हल्लाबोल करणार आहेत. दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी उत्सव असायचा. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत. उद्धव ठाकरे यांनीही परंपरा सुरू ठेवली असली आणि गर्दी होत असली तरी त्यातून शिवसैनिकांना विशेष वैचारिक खाद्य काही मिळत नसे. मात्र, आता भाजपचे हिंदुत्व बेगडी असून शिवसेनाच प्रखर हिंदुत्ववादी असल्याचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणातून करणार आहेत. तसेच ते राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला घेरणार आहेत. भाषणासाठी काढलेल्या मुद्द्यांमध्ये हा मुद्दा प्राधान्याने घेण्यात आलेला आहे. सांगलीत मंगळवारी धनगर आरक्षणासाठी दोन दसरा मेळावे झाले. समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी बिरोबा देवस्थान समितीकडून बिरोबा मंदिरासमोर देवस्थान समितीचा अधिकृत दसरा मेळावा झाला, तर आतापर्यंत भाजपचे स्टार प्रचारक राहिलेले गोपीचंद पडळकर हे गुजरातमधील पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत आरेवाडीच्या बिरोबाच्या बनात हा दसरा मेळावा झाला. मात्र या निमित्ताने धनगर समाजात दोन गट निर्माण झाले. म्हणजे मेळाव्यातून एकजुट ऐवजी फाटाफुटीचे दर्शन घडले. आजवर धनगर आरक्षणासाठी एकवटलेला एकसंघ धनगर समाज, आज मात्र ताकद विभागल्याने संकटात सापडला आहे. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय वारसदार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजकीय शक्तीस्थळ म्हणून परळीत गोपीनाथगडाची निर्मिती केली. परिणामी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात राजकीय भाषणबाजीस बंदी घातली आणि महंत व मंत्री मुंडे यांच्यात संघर्ष उभा राहिला. पहिल्या वर्षी गडाच्या पायथ्याला मेळावा घेतल्यानंतर गेल्या वर्षी संत भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव घाट (ता.पाटोदा) येथे मेळावा स्थलांतरीत करत दोन दिवसांत गर्दी जमवून समाजावरील आपली पकड मजबूत असल्याचे दाखवून दिले. यावर्षी दुसरा मेळावा ऐतिहासिक व्हावा यासाठी समर्थकांनी राज्यभर तयारी सुरू केली आहे. मंत्री मुंडे यांनीही समाजमाध्यमातून ‘आपली परंपरा भक्ती आणि शक्तीचा संगम’ अशी साद घालत मेळाव्याला येण्याचे आवाहन केल्यामुळे यावर्षीचा मेळावा नेमका कसा होतो आणि मुंडे काय बोलतात याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दसर्याच्या दिवशी नागपुरात होणारे दोन कार्यक्रम सार्या देशाचे लक्ष वेधून घेणारे असतात. दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा महोत्सव. दोन्ही कार्यक्रमात कोण काय बोलतात, याकडे सार्यांचे लक्ष असते. दीक्षाभूमीचा कार्यक्रम देशभरातील लाखो बौद्ध बांधवांसाठी श्रद्धेचा विषय असतो. त्यामुळे कायम मतांचा विचार करणारे राज्यकर्ते हा कार्यक्रम कधीच चुकवत नाहीत. यानिमित्ताने भरभरून घोषणा करून या बांधवांना आपलेसे कसे करून घेता येईल, याकडे त्यांचा कटाक्ष असतो, तर या कार्यक्रमाचे आयोजक यानिमित्ताने सरकारकडून आणखी काय पदरात पाडून घेता येईल, या विवंचनेत असतात. संघाच्या दसरा मेळाव्यातील सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणाकडे यावेळी देशाचे लक्ष असते. मात्र, उन्मादातून दलितांची मुस्लिमांच्या हत्या घडल्याचे प्रकार घडले त्याबाबत अवाक्षर निघत नाही संघाच्या परिवारातील घटक आहोत, असे अभिमानाने सांगणार्या अनेक संघटना सध्या गाय व गोमांस यावरून आगखाऊ भाषा करीत आहेत. देशातील सारे प्रश्न संपले असून फक्त हाच एक प्रश्न शिल्लक आहे, असे भासवले जात आहे. यातून जन्म घेणार्या उन्मादाला जबाबदार कोण? या संघटनांना कुणी आवरायचे? यावर मागील काही दसरा मेळाव्यात संघ व्यक्त झाला असता तर बरे झाले असते. प्रमुखाने एकात्मतेची भाषा बोलायची आणि अनुयायांनी खपवून घेणार नाही, असे ठणकावून सांगायचे, हा दुटप्पीपणा झाला. एकूणच दसर्यातील पावित्र्य हरपून बदला घेण्याची भाषा मेळाव्यातून दिसत आहे.