शिवसेनेतर्फे मागणी; जिल्हाधिकार्यांना दिले मागणीचे निवेदन
जळगाव । दसर्यापर्यंत शेतकर्यांना कर्जमाफी झाली नाही; तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जिल्हा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. जिल्हाधिकार्यांना याबाबत सोमवारी ११ रोजी निवेदन देण्यात आले.
शेतकरी कर्जमाफी तातडीने द्यावी यासाठी राज्यात शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्याची मोहीम राबविण्यात आली. जळगाव येथेही जिल्हा शिवसेनेतर्फे आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार चिमणराव पाटील, आर. ओ. पाटील. आदी उपस्थित होते. निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की शासनाने राज्यातील शेतकर्यांसाठी तीन महिन्यांपासून कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. परंतु आतापर्यंत एकाही शेतकर्याला कर्जमुक्ती मिळालेली नाही.
शिवाय पेरणीसाठी राज्य सरकारने दहा हजार रुपये तातडीची मदत जाहीर केली होती. परंतु आतापर्यंत एकाही शेतकर्याच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. शिवसेनेने या विरोधात शेतकरी मेळावा’ घेऊन आंदोलन केले. तसेच जिल्हा बँकेसमोर ढोल बजाओ आंदोलन केले. तरीही शेतकर्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. शासनाला आता इशारा देण्यासाठी निवेदन देत आहोत, शेतकर्यांना दसर्यापर्यंत कर्जमाफी द्यावी, मात्र शासनाने जर ही मागणी मान्य केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.