पुणे : राज्यातील भारतीय जनता पक्ष – शिवसेनेच्या युती सरकारमध्ये कधीही काडीमोड होऊ शकतो. सत्तेतून बाहेर पडण्याची तयारी शिवसेनेने केली असून, दसर्यापर्यंत शिवसेना आपला फैसला घेईल, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली. कालच मातोश्रीवर शिवसेनेच्या खासदार, आमदार, मंत्री व संपर्कप्रमुखांची महत्वपूर्ण बैठक झाली होती. या बैठकीत बहुतांश नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडावे, असा सूर लावला होता. त्यानुसार, ठाकरे हे निश्चित निर्णयापर्यंत आले असून, या सरकारचे भवितव्य अनिश्चित असल्याची माहितीही या सूत्राने दिली.
शिवसेनेला हवीत दोन कॅबिनेट, सात राज्यमंत्रिपदे?
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात खांदेपालट प्रस्तावित आहे. तसेच, काँग्रेस नेते नारायण राणे हेदेखील भाजपमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने सरकारवर पुन्हा एकवेळ टीकास्त्र डागत, सरकारमधून बाहेर पडण्याचे सूतोवाच केले आहे. आम्ही निर्णयाप्रत आलो आहोत. कधीही आमचा निर्णय होऊ शकतो, अशी माहिती पक्षप्रवक्ते खा. संजय राऊत यांनी कालच दिली होती. याबाबत माहिती देताना सूत्राने सांगितले, की शिवसेना सरकारमधून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. यंदा लांडगा आला रे सारखी त्यांची गत होणार नाही. नारायण राणे यांचा भाजपप्रवेश झाला की लगेचच तशी घोषणा करण्यात येईल, असेही सूत्र म्हणाले. सद्या फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेचे 12 मंत्री आहेत. त्यात केवळ पाच कॅबिनेट मंत्री आहेत. तर केंद्रातील मोदी सरकारमध्ये शिवसेनेचा केवळ एक मंत्री आहे. त्यामुळे केंद्रात तीन व राज्यात आणखी दोन कॅबिनेट मंत्रिपदे शिवसेनेला हवी आहेत. तसेच, सात राज्यमंत्रिपदाची मागणीही शिवसेनेकडून होत असल्याचे सूत्र म्हणाले. त्यामुळे फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला मनासारखी मंत्रिपदे देतात की नाही, याकडे तूर्त तरी शिवसेना नेतृत्वाचे लक्ष लागून आहे.
25 आमदार विरोधात, निवडणुकांसाठी पैसा नाही!
शिवसेना आमदारांची विकासकामेच होत नसल्याने सरकारमध्ये राहायचेच कशाला, अशी भूमिका घेत, शिवसेनेने देवेंद्र फडणवीस सरकारला अल्टिमेटम दिला खरा; पण सरकारमधून बाहेर पडण्यास सेनेच्या तब्बल 25 आमदारांनी तीव्र विरोध दर्शविल्याने, या अल्टिमेटमची हवाच निघाली. फडणवीस सरकारला अंतिम निर्वाणीचा इशारा देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्री व आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दोन वेळा खडाजंगी झाली. उद्धव ठाकरे हा सर्व प्रकार हताशपणे पाहात होते. शिवसेना जर सरकारमधून बाहेर पडली आणि राज्यात मध्यावधी झाल्यास निवडणूक लढण्यासाठी पैसे नाही, असे पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी सांगितले. त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय तूर्तास तरी लांबणीवर टाकण्यात यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
मुख्यमंत्री म्हणतात आम्ही अल्टिमेटच!
दरम्यान, आम्ही अल्टिमेटच आहोत, शिवसेनेने याचा जो अर्थ लावायला तो लावू दे, अशी सूचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी दिली. राज्य कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला भाजपसह शिवसेनेचे मंत्री उपस्थित होते. सेनेचे कोणतेही मंत्री या बैठकीत आक्रमक दिसले नाही. सर्वच जण शांत होते. या बैठकीनंतर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना सेनेच्या अल्टिमेटमबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मला बोलायची गरज नाही. आम्ही अल्टिमेटच आहोत. सेनेला जो अर्थ घ्यायचा तो घेवू दे, असेही त्यांनी ठणकावले.