दसर्‍याला सदाभाऊंची नवी शेतकरी संघटना!

0

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आलेले पणन राज्यमंत्री आणि संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी नवी संघटना उभारणार असल्याचे संकेत दिले आहेत. शेतकर्‍यांसाठी आपण शेवटपर्यंत लढणार असून, त्यासाठी नवी शेतकरी संघटना स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या संघटनेचे नाव अद्याप ठरलेले नाही; कार्यकर्त्यांकडून यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत. राज्यभरातील शेतकर्‍यांची मते जाणून घेऊन याबाबत निर्णय घेणार असल्याचेही खोत यांनी सांगितले. येत्या दसर्‍याला संघटनेचे नाव ते घोषित करणार असल्याचे कळते.

खोतांवर झाली होती कारवाई!
नैतिकतेच्या मुद्द्यावरून आणि पक्षशिस्त मोडल्याच्या करणामुळे सदाभाऊ खोत यांच्यावर विशेष चौकशी समितीच्या माध्यमातून कारवाई करीत संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. 25 वर्षे चळवळीत काम करणार्‍या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही याचा गांभीर्याने विचार करीत, सदाभाऊ खोत यांनी आजवर संघटनेवर केलेल्या आरोप-प्रत्यारोप तसेच त्यांच्यावर मध्यंतरी करण्यात आलेले आरोप लक्षात घेता, त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याचे समितीने म्हटले होते. खोत यांच्यात सत्तेला चिटकून राहाण्यासाठीची धडपड समितीच्या बैठकीतील उत्तरांमधून दिसून आल्याचे चौकशी समितीने म्हटले होते. त्याचबरोबर सदाभाऊंनी पुणतांब्यातील शेतकर्‍यांचे आंदोलन फोडले. तसेच स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी देशभरातल्या 150 संघटना एकत्र आल्या. मात्र, हा केंद्राच्या आखत्यारितील विषय असल्याचे सांगत ते यापासून आलिप्त राहिल्याचा ठपकाही यावेळी सदाभाऊंवर ठेवण्यात आला होता.